‘बिग बॉस’ सीझन २०ची नुकतीच घोषणा झाली आहे. लवकरच या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन थिमसह ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. नुकताच सलमान खानचा पहिला प्रोमो प्रसारित झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोणते सेलिब्रिटी झळकणार याबद्दल आता प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली आहे. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनीसुद्धा त्यांना ‘बिग बॉस’ हिंदीची ऑफर आल्याची माहिती दिली आहे.
छाया कदम यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना ‘बिग बॉस’ हिंदीसाठी विचारणा झाल्याचा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी रिअॅलिटी शोबद्दलचं त्यांचं मतही व्यक्त केलं आहे. छाया कदम यांना ‘बिग बॉस’ हिंदीसाठी विचारणा कधी झाली होती आणि त्यांनी नकार का दिला याबद्दल सांगितलं आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊयात…
छाया कदम यांची बिग बॉस हिंदीबद्दल प्रतिक्रिया
रिअॅलिटी शोच्या ऑफर आल्या आहेत का असं विचारल्यानंतर छाया कदम ‘बिग बॉस’च्या ऑफरबद्दल म्हणाल्या, “खरं सांगायचं तर मला हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती. मी कान्समध्ये पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला ऑफर आली होती. तेव्हा त्यांना असं वाटत होतं की मी बिग बॉसमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्नही केले, पण मला नाही जमलं. कारण माझं असं होतं की नाही आता तरी मला नाही करायचं आहे. पण हो हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती”.
पुढे रिअॅलिटी शोबद्दल काय मत आहे असं विचारल्यानंतर छाया कदम म्हणाल्या, “मला असं वाटतं की तुमच्या खासगी गोष्टी ज्या तुम्हालाच माहीत असतात, ज्या तुमच्याच आहेत त्याबद्दल मी जगासमोर का बोलू. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की नाही मला नाही करायचा आहे. लोकांना खूप आवडतो. मी त्यांना सांगितलं की तुमचा टीआरपी वगैरे खूप छान आहे.”
छाया कदम पुढे म्हणाल्या, “मी जरी नाही म्हटलं असलं तरी माझ्या आजुबाजूचे लोक बिग बॉस बघतात. माझी मावशी खूप बघते. माझं ऐकत नाही तिला खूप आवडतं”. पुढे त्यांना तुम्ही काय बघता, कोणता रिअॅलिटी शो बघता असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मी आमच्या मराठीतील महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो. कारण त्यातील लोक खूप चांगलं काम करतात. हसवता हसवता सामाजिक मॅसेजही देतात”.
