प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जपून ठेवलेल्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणारा नवा कोरा कौटुंबिक चित्रपट ‘चिकीझिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला १९ नोव्हेंबर रोजी येणार आहे.
‘चिकीझिंग’ची जगभरातील १६ प्रतिष्ठित अशा पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाली असून, आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी आणि मनाला भुरळ घालणारा टिझर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला. हा टिझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, नेटकरी समाजमाध्यमांवर भावुक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.
दीपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत ‘चिकीझिंग’ या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या
निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शन राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी केले आहे. ‘चला चला मामाच्या गावाला…’ या सुरेल गाण्याची जोड दिल्याने टिझर खऱ्या अर्थाने लक्षवेधी बनला आहे.
या टिझरविषयी दिग्दर्शक म्हणाले की, ‘चिकीझिंग’चा हा टिझर केवळ चित्रपटाची पहिली झलक नसून, प्रेक्षकांना त्यांच्या हरवलेल्या बालपणाशी आणि निरागस स्वप्नांशी पुन्हा जोडून देणारा एक भावनिक सेतू आहे. हा टिझर चित्रपटाचा खरा आत्मा आणि चिक्याच्या विश्वाची नेमकी ओळख सर्वांसमोर प्रभावीपणे उलगडतो.
चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. लेखन आणि कथा-पटकथा राजेंद्र बगाटे व वैभव कुलकर्णी यांनी पेलली आहे. छायांकनाची धुरा प्रवीण सोनावणे यांनी सांभाळत निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य कॅमेऱ्यात अचूक टिपले आहे. संगीताची सुमधुर बाजू श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी सजवली आहे. संकलनाची जबाबदारी शेखर गुरव आणि एस शंकर यांनी पार पाडली आहे. कला दिग्दर्शन आणि वेशभूषा सुरेश कुंभार यांनी चोख सांभाळली आहे.
