ऑगस्टमधील उत्पादनाची बागायतदारांना प्रतीक्षा

पालघर : डहाणू व पालघर तालुक्यात होणारे चिकू उत्पादनाला वादळाचा मोठा फटका बसला आहे.  बागायदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकू पिकाचा पुढचा बहर येण्यास ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिना उजाडेल, असे चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.

चक्रीवादळात आंबा, केळी व जांभूळप्रमाणे चिकू फळाचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  किमान तीन हजार टन तयार चिकू वाया गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या चिकूला १० ते १५ रुपये प्रति किलो इतका दर  असून त्यावर आधारित इतर व्यवसायांचे नुकसान धरून किमान सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची  शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

डहाणू तालुक्यात साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर चिकू लागवड केली जाते.  वादळात प्रत्येक झाडाची किमान २० ते ३० किलो फळाचे नुकसान झाले आहे. आता देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक झाडाला शंभर किलो शेणखत व खर्च येत असून शासनाने हेक्टरी मदत देण्याऐवजी प्रत्येक झाडाला किमान पाचशे रुपये अशी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बोर्डी येथील चिकू बागायतदार यांनी केली आहे.

१९४९ आली झालेल्या वादळामध्ये बोर्डी येथील सहा हेक्टर चिकू बागायती करणाऱ्या एका शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयांची नुकसान भरपाई तत्कालीन सरकारने दिल्याचे पुरावे पुढे आले आहेत. त्यातुलनेत सध्या शासनाकडून मिळणारे पीक विमा अंतर्गत मिळणारी रक्कम किंवा शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम तुटपुंजी असल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे.