चीनी अॅनिमेटेड चित्रपट ‘निऊ लाई’ (Niu Lai), ज्याचा इंग्रजी अर्थ ‘द काऊ इज कमिंग’ असा होतो, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाची त्याच्या अत्यंत खराब अॅनिमेशनसाठी सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. मात्र, याच ट्रोलिंगमुळे चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि तो अचानक व्हायरल झाल्यानंतर हिट ठरला.
विशेष म्हणजे, चीनमध्ये ‘निऊ लाई’ने ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’लाही मागे टाकलं, तर दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’बरोबरही त्याची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा सुरू झाली आहे. ८६ मिनिटांचा हा चित्रपट एका नुकत्याच जन्माला आलेल्या वासराच्या विचित्र पद्धतीने सुरू असलेल्या प्रवासाची गोष्ट सांगतो. ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे सुरुवातीला फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही. मात्र, नंतर चित्रपटातील काही क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आणि प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दलच्या चर्चा खऱ्या आहेत का, हे पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे धाव घेतली. त्यामुळे हा चित्रपट अचानक ट्रेंडिंगमध्ये आला.
किती केली कमाई
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार प्रदर्शनाच्या पहिल्या १० दिवसांत चित्रपटाला १० हजार युआन (सुमारे १,४८० डॉलर) इतकीही कमाई करता आली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, एका दिवसाची कमाई तर केवळ २०० युआन (सुमारे ३० डॉलर) इतकी होती. मात्र, १४ ऑगस्टच्या आसपास चित्रपटातील क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर चित्रपटाच्या कमाईने अचानक वेग धरला.
प्रेक्षकांनी चित्रपटातील अगदी प्राथमिक दर्जाचे कॉम्प्युटर ग्राफिक्स, पात्रांच्या हालचालींमधील कृत्रिमपणा आणि विचित्र व्हॉइस अॅक्टिंग लगेच हेरली. काहींनी हा चित्रपट एखाद्या विद्यार्थ्याने तयार केलेल्या प्रोजेक्टसारखा वाटत असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्याची खिल्ली उडवत तो AI पेक्षाही वाईट असल्याचं सांगितलं. काही प्रेक्षकांनी तर त्याला २०२६ मधील सर्वात वाईट चित्रपट ठरण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटातील क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच, ऑनलाइन होत असलेली टीका हळूहळू उत्सुकतेत बदलली. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत अचानक मोठी वाढ झाली. यापूर्वी या चित्रपटाबद्दल काहीही माहिती नसलेले प्रेक्षकही तो नेमका कसा आहे, हे पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करू लागले.
A newly released animated film called “Niu Lai” (牛来) is going viral for all the wrong reasons in China.
— Tong Bingxue 仝冰雪 (@tongbingxue) August 15, 2026
People are calling the visuals “disaster-level” , the entire production team was basically just two people: the director and the screenwriter. After 9 days in theaters, the… pic.twitter.com/l7RM9ZER67
१५ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत मोठी वाढ झाली. कमाई ७ लाख १७ हजार युआनवर पोहोचली. यानंतर चित्रपटगृहातील या सिनेमाच्या शोमध्ये वाढ झाली. १७ ऑगस्टपर्यंत ‘Niu Lai’ने १ कोटी ७१ लाख युआन (सुमारे २.५ दशलक्ष डॉलर) कमावले आणि २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चिनी अॅनिमेशन चित्रपटांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवलं, अशी माहिती ABC Newsच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. १८ ऑगस्टलाही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम राहिली. या दिवशी रिअल-टाइम कमाई २३ लाख युआन (सुमारे ३,४१,२१३ डॉलर) इतकी झाली. काही काळासाठी हा चित्रपट चीनच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस चार्टवर चौथ्या क्रमांकावर पोहोचला आणि त्याने ‘स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे’लाही मागे टाकलं.
A newly released animated film called “Niu Lai” (牛来) is going viral for all the wrong reasons in China.
— Tong Bingxue 仝冰雪 (@tongbingxue) August 15, 2026
People are calling the visuals “disaster-level” , the entire production team was basically just two people: the director and the screenwriter. After 9 days in theaters, the… pic.twitter.com/l7RM9ZER67
Manila Bulletinच्या वृत्तानुसार, या चित्रपटाची आता हॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांशी बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा सुरू आहे. यात ख्रिस्तोफर नोलन यांच्या The Odyssey आणि टॉम हॉलंडच्या ‘स्पायडर मॅन’ चित्रपटाचाही समावेश आहे. चित्रपटगृहांमधील दमदार कामगिरीबरोबर सोशल मीडियावरही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. Douban या वेबसाइटवर आतापर्यंत चित्रपटाबद्दल ६५० हून अधिक रिव्ह्यू पोस्ट करण्यात आले आहेत. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाचं वर्णन असामान्यपणे वाईट, पण डोळे उघडणारा असं केलं आहे. तर काहींनी तो इंटरनेट ट्रोलिंगच्या नव्या ट्रेंडचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. रेड स्टार न्यूजच्या वृत्तानुसार, ‘Niu Lai’ हा चित्रपट दिग्दर्शक Xin Yu Meng आणि त्यांची आई Sun Lifan यांनी तब्बल पाच वर्षांत तयार केला आहे. या दोघांनीच चित्रपटाच्या निर्मितीतील जवळपास प्रत्येक जबाबदारी सांभाळली. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अॅनिमेशन, एडिटिंगपासून आवाज देण्यापर्यंतची कामं त्यांनी स्वतः केली आहेत.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे ३० हजार युआन (अंदाजे ४,४५० डॉलर) इतकंच बजेट होतं. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या कंपनीचं नोंदणीकृत भांडवल १ लाख युआन (अंदाजे १४,८३५ डॉलर) असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे, २०२१ पर्यंत या कंपनीला चित्रपट निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या मार्केटिंगमुळेही त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढली. अधिकृत प्रमोशनमध्ये पारंपरिक चिनी इंक-वॉश पेंटिंगच्या शैलीत तयार केलेल्या पोस्टरवर भर देण्यात आला होता. त्यामुळे पोस्टरवरील कलाकृती आणि प्रत्यक्ष चित्रपटातील सामान्य दर्जाच्या अॅनिमेशनमध्ये मोठा फरक दिसून आला. चित्रपट लोकप्रिय होऊ लागल्यानंतर चित्रपटगृहांनी स्वतःची पोस्टर्स तयार करण्यास सुरुवात केली. यात वासराची चित्रं आणि विचित्र गोष्टी आवडत असतील तर नक्की या, पैसे परत मिळणार नाहीत अशा मजेशीर घोषणा लिहिण्यात आल्या.
अशाप्रकारे ‘Niu Lai’ हा फारशी दखल न मिळालेला चित्रपट अचानक या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. सुरुवातीला सोशल मीडियावरील टीकेमुळे त्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर उत्सुकतेपोटी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले. अवघ्या २०० युआनच्या दैनंदिन कमाईपासून सुरू झालेला या चित्रपटाचा प्रवास आता चीनच्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टुडिओच्या चित्रपटांना टक्कर देण्यापर्यंत पोहोचला आहे.
