गेल्या काही दिवसांपासून देशभरात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. नुकतंच चिन्मय या चित्रपटाबद्ल्ल होणारी टीका, त्यामागची तयारी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस उलटले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर काहींच्या अंगावर अक्षरश काटा आला, असे मत प्रेक्षक व्यक्त करत आहे. नुकतंच बिट्टाची भूमिका जिवंत करणाऱ्या चिन्मय मांडलेकरने न्यूज १८ लोकमत या वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच या चित्रपटाबद्दलचे मत व्यक्त केले. तसेच काही चित्रपटगृहात बिट्टाचे संवाद म्यूट करुन दाखवण्यात आले आहे, याबद्दलही त्याने भाष्य केले.

“काही चित्रपटगृहात बिट्टाचे ठराविक संवाद म्यूट करून दाखवण्यात येत आहे, असं माझ्याही कानावर आलं. हे फार चुकीचं आहे. बिट्टाच्या तोंडचे संवाद हा सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. ते चित्रपटातील एक पात्र आहे. मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटातील माझ्या तोंडी असलेल्या कुठल्याही संवादाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, असे मला वाटत नाही”, असे चिन्मय म्हणाला.

“मी या चित्रपटासाठी फार मेहनत घेतली आहे. खूप मेहनत घेऊन त्याने बिट्टा रंगवला आहे. बिट्टाच्या भूमिकेसाठी माझं नाव पल्लवी जोशीने सुचवलं होतं. पल्लवी आणि मी आम्ही एका मराठी मालिकेत एकत्र काम केलं होतं. पल्लवी मला चांगली ओळखते. पण सामान्य कलाकाराप्रमाणे मीसुद्धा स्क्रीन टेस्ट, ऑडिशन अशा पायऱ्या पार करूनच या भूमिकेपर्यंत पोहोचलो. या भूमिकेसाठीचे काही डायलॉग्ज मला वाचायला दिले होते. ते सर्व ऐकून घेतल्यानंतरच चिन्मयचं नाव बिट्टासाठी निश्चित केलं गेलं. त्यानंतर बिट्टाचं कॅरेक्टर रंगवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा बरंच साहित्य उपलब्ध करुन दिलं”, असेही चिन्मयने सांगितले.

“या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी फार खूश आहे. आम्ही सगळ्यांनीच घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे, असं मला वाटतं. या चित्रपटाला अशाप्रकारे प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं नव्हतं. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.” असे चिन्मय मांडलेकर म्हणाला.

भूमिकेची तयारी कशी केली?

“मला माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बिट्टासारखी भूमिका अद्याप मिळाली नव्हती. त्यामुळे काश्मिरी अतिरेक्याची ही भूमिका निभावण्यासाठी मला खूप तयारी करावी लागली. यासाठी मी काही व्हिडीओ पाहिले. तसेच बिट्टाचे काही जुने व्हिडीओही मला मिळाले. मी ते वारंवार पाहत होतो. याशिवाय या संदर्भातील अनेक कागदपत्रही मी वाचत होतो. त्यामुळेच मला या भूमिकेला न्याय देता आला.” असे चिन्मय मांडलेकरने सांगितले.

दरम्यान १२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Story img Loader