आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखले जाते. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा अनेक बाजू तो समर्थपणे सांभाळताना दिसतो. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘शेर शिवराज’ हे चित्रपट चांगलेच गाजले. या चित्रपटात चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सध्या चिन्मय मांडलेकरांच्या मुलाला ट्रोल केलं जात आहे. यावरुन त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिने परखड मत व्यक्त केलं आहे. नेहा जोशी हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिने काही कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यातील एका कमेंटमध्ये चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन त्याला ट्रोल केलं जात आहे. "मला तर चिन्मय मांडलेकरने पोराचं नाव जहांगीर ठेवलंय इथेच खटकलाय", असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर इतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत नेहाने प्रतिक्रिया दिली आहे.आणखी वाचा : “दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटामुळे कधीही…” ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर चिन्मय मांडलेकरची सावध प्रतिक्रिया नेहा जोशीची पोस्ट "प्रिय ट्रोलर्स, ह्याचा आता कंटाळा आलाय. अजून किती काळ तुम्ही ९ वर्षांच्या मुलाला लक्ष्य बनवणार आहात? प्रत्येकवेळी त्याच्या वडिलांचा नवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही मिळवलं आहे, त्याचा अनेकांना लाभ झाला आहे. आमच्या मुलाचे नाव आम्ही त्यांच्या नावावरुन ठेवलेले आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.पण मी हे सर्व कोणाला सांगतेय? त्यांना हे अगोदरपासून माहित नाही का? हे लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ही लोक काहीतरी निमित्त शोधत असतात. संस्कार, संस्कृती नेमके काय असतात? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात! त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसं आहोत. माझे संगोपन आणि मूल्ये अशा चेहर्याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात, हे सहन करण्यास मनाई करतात", असे चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहाने म्हटले आहे. आणखी वाचा : “अजून किती वर्ष हा त्रास…”, ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळेची संतप्त पोस्ट चिन्मय मांडलेकर हा सध्या राजकुमार संतोषी यांच्या गांधी आणि गोडसे या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे. यामुळे चिन्मयला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळीही त्याला ट्रोल केले गेले होते. चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव जहांगीर असे आहे. त्याच्या नावामुळेच त्याला ट्रोल केले जात आहे. यावर नुकतंच चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकरने एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.