Chiranjeevi Rudraveena National Film Awards Controversy: दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून त्यांचा पूर्ण देशात मोठा चाहतावर्ग आहे. १९८८ मध्ये त्यांच्या ‘रुद्रवीणा’ या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ मिळाला होता. तो स्वीकारण्यासाठी चिरंजीवी हे दिल्लीला गेले होते. यावेळी सभागृहातील चित्र पाहून त्यांना अपमानास्पद वाटल्याचा अनुभव आल्याचा किस्सा त्यांनी शेअर केला.
दिल्लीमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल चिरंजीवींना खूप आनंद झाला होता. मात्र, तिथे गेल्यानंतर सभागृहात लावलेल्या चित्रांमुळे त्यांना खूप वाईट वाटलं होतं. ही वाईट आठवण तीन दशकं त्यांच्या मनामध्ये राहिली होती. २०२२ मध्ये त्यांनी एका कार्यक्रमामध्ये याबद्दल खुलासा केला होता. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील सभागृहात बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांचे फोटो लावण्यात आले होते; मात्र दक्षिणात्य कलाकारांचे फोटो तिथं नसल्यानं चिरंजीवी यांना मोठा धक्का बसला होता.
बॉलीवूडमधील कलाकार होते पण दाक्षिणात्य नाही – चिरंजीवी
याबद्दल चिरंजीवी म्हणाले, “मी पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीतील सभागृहात गेलो होतो. यावेळी तिथं बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांचे फोटो होते. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, दिलीप कुमार अशा अनेक कलाकारांची तिथं चित्रं होती. भारतीय सिनेमाचा गौरवशाली इतिहास आणि वैभव दाखवणाऱ्या कलाकारांचे ते फोटो होते. पण, यामध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दाक्षिणात्य सिनेविश्वातील अगदी मोजक्याच कलाकारांचे फोटो तिथं लावण्यात आले होते.”
पुढे ते म्हणाले, “दक्षिण भारतातील फक्त काहीच कलाकाराचा तिथं फोटो होता. मल्याळममधील प्रेम नझीर, तमिळ सिनेमातील एमजीआर आणि जयललिता यांचा एकत्र फोटो होता. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच फोटो नव्हता. दाक्षिणात्य कलाकार डॉ. राजकुमार, विष्णुवर्धन, एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वर राव, शिवाजी गणेशन आणि सावित्री यांसारख्या दिग्गजांचा फोटो तिथं असायला पाहिजे होता.”
पुढे ते म्हणाले, “या सर्व कलाकारांना दक्षिण भारतातील प्रेक्षक देवासारखं मानतात. ते आमच्यासाठी कायम आदरणीय राहिले आहेत, पण त्यांचे फोटो तिथं नव्हते. माझ्यासाठी हा अपमानास्पद क्षण होता. मला खूप वाईट वाटलं. यावरून त्या काळात राष्ट्रीय पातळीवर दाक्षिणात्य सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येत होता. तेव्हा फक्त हिंदी सिनेमालाच भारतीय सिनेमा मानलं जात होतं आणि इतर भाषांमधील सिनेमांना प्रादेशिक सिनेमा म्हणून दुर्लक्षित केलं जात होतं.”
दरम्यान, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांना ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ दिला जातो. चिरंजीवींच्या ‘रुद्रवीणा’ सिनेमाला हा पुरस्कार मिळाला होता. के. बालचंदर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू यांनी त्यांच्या ‘अंजना प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून केली होती.
