तमिळ अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या विधानानंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून मन्सूर अली खानविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांनी त्रिशाला पाठिंबा देत मन्सूरच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
चिरंजीवी यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं, “अभिनेता मन्सूर अली खानने त्रिशाबद्दल केलेल्या निंदनीय विधानांबद्दल कळलं. त्यांची ही विधानं फक्त कलाकारासाठीच नाही तर कोणत्याही स्त्री व मुलीसाठी आक्षेपार्ह आणि घृणास्पद आहेत. अशा वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे, कारण हा विकृतपणाचा कळस आहे. मी त्रिशा आणि तिच्यासारखी प्रत्येक स्त्री जिला अशा घृणास्पद विधानांचा सामना करावा लागतो, त्यांच्याबरोबर आहे.”




मन्सूर अली खानचं विधान नेमकं काय?
“जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं मन्सूर अली खान म्हणाला होता.
मन्सूर अली खानबरोबर काम करण्याची त्रिशाची भूमिका
“नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबद्दल अतिशय अश्लील आणि घृणास्पद बोलले आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. ती टिप्पणी लिंगभेद करणारी, अपमानास्पद, घृणास्पद आणि वाईट होती. त्यांनी त्यांची इच्छा बाळगावी, पण मी त्यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर स्क्रीन स्पेस कधीही शेअर केली नाही याचा मला आनंद आहे. माझ्या नंतरच्या फिल्मी करिअरमध्येही कधीच काम करणार नाही याची मी काळजी घेईन. त्यांच्यासारखे लोक मानवजातीचे नाव बदनाम करतात,” असं त्रिशाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं.