‘मराठी चित्रपटात सकारात्मक बदल होतोय’

‘मराठी चित्रपटाची जाहिरात तर होते पण प्रसिद्धी होत नाही.’

varsha
वर्षा उसगावकर, दिलीप ठाकूर, मृणाल कुलकर्णी
मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढतानाच त्यात बदलत्या समाजाचेही भान आहे व तेच भान मराठी चित्रपटाचा आशय व सादरीकरण यामधील दर्जा कायम ठेवूनच पुढील वाटचाल होईल असा विश्वास चित्रपट संमेलनात व्यक्त करण्यात आला. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात संवाद या संस्थेच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनातील ‘मराठी चित्रपटाचा बदलता प्रवाह ‘ या परिसंवादात विविध पद्धतींनी मांडला. राज काझी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. यामध्ये वर्षा उसगावकार, मृणाल कुलकर्णी, दिलीप ठाकूर, महेश कोठारे, अरुणा अंतरकर व गजेन्द्र अहिरे यांनी सहभाग घेतला.
दीड तास रंगलेल्या या परिसंवादात मराठी चित्रपटाची जाहिरात तर होते पण प्रसिद्धी होत नाही , त्यात कल्पकतेचा अभाव जाणवतो, तसेच कसदार कथा हा मराठी चित्रपटाचा कणा असला तरी मराठीतही चित्रपटांना गर्दी खेचणारे स्टार आहेत. सोशल मिडियात मराठी चित्रपट प्रसिद्धीत रस घेत असला तरी त्यावरील विक्रमी लाईक्सप्रमाणेच प्रेक्षक देखील लाभावेत , या व्यवसायात येण्यापूर्वीच चित्रपट हे माध्यम व व्यवसाय म्हणून नेमके काय आहे हे जाणून घ्यावे अशाही अनेक गोष्टींवर मुद्देसूद चर्चा झाली.

‘श्वास ‘पासून मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेत असे म्हटले जात असले तरी तत्पूर्वीही ‘पछाडलेला ‘ इत्यादी अनेक चित्रपट गर्दी खेचत होते. ‘श्वास ‘ला राष्ट्रीय पुरस्कारात विशेष सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त झाला आणि तो ऑस्करसाठीची आपल्या देशाची प्रवेशिका ठरल्यावर तात्कालिक प्रसार माध्यमातून त्याची भरपूर चर्चा झाल्यानंतर मराठी साहित्य सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असाही एक महत्त्वपूर्ण मुद्दा या चर्चेत आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chitrapat sammelan varsha usgaonkar mrunal kulkarni discussion on marathi movies