रेश्मा राईकवार

जसं दिसतं तसं नसतं हे जितकं खरं आहे. तितकंच अनेकदा जे दिसतं आहे त्यावर तितक्याच प्रामाणिकपणे भाष्य करण्याची संधी त्याहीपेक्षा जे आहे ते तसंच मांडण्याचा प्रयत्न केला जातोच असं नाही. राजकारणात तरुणांनी उतरायला हवंच, मात्र त्यासाठी चौका-चौकात बसलेले कार्यकर्त्यांचे अड्डे, आमचाच नेता खरा हे दाखवण्यासाठी दोन गटांमध्ये होणारे राडे, उत्सवांचं राजकारण आणि त्या जोरावर होणारी भाईगिरी हे काहीच कामाला येत नाही. या खोटय़ा राजकीय ‘चौक’टीत अडकलेल्या अशा कित्येक तरुणांच्या आयुष्याची कशी राखरांगोळी झाली याचं सरळसोट पद्धतीने चित्रण देवेंद्र गायकवाड यांनी आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नात केलं आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

देशपातळीवरचे पक्ष म्हणून मिरवणाऱ्या सगळय़ाच राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी ही अगदी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. पक्षाची त्याहीपेक्षा पक्षातल्या स्थानिक नेत्यांची चांगली-वाईट जी काही तथाकथित हवा होते ती या कार्यकर्त्यांच्या जोरावर.. त्यामुळे गल्लीबोळातील खमक्या तरुणांना हाताशी धरून त्यांची स्वप्नं आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा यांचा जो काही खेळ खेळला जातो त्याबद्दल लोकांना माहितीच नसते असं म्हणणं धाष्र्टय़ाचं ठरेल. पण शेवटी तो प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी-निवडीचा भाग आहे. सरसकट राजकारण वा राजकीय कार्यकर्ता होणं हे वाईटच असं म्हणणंही चुकीचं आहे. त्यामुळे अतिशय संयतपणे राजकारण आणि भाईगिरीबद्दलच्या भ्रामक कल्पना उराशी बाळगून कार्यकर्ता म्हणून उगीचच आक्रमकपणे वावरणाऱ्या, आपण काहीही करू शकतो-आपल्यावरचे गुन्हे असे मिटवले जातील अशा फाजील आत्मविश्वासाने वावरणाऱ्या तरुणाईचं पुढे काय होतं याचं वास्तवदर्शी शैलीच्या जवळ जाणारं चित्रण दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी ‘चौक’ चित्रपटातून केलं आहे.

टायगर आणि अण्णा हे दोन तथाकथित मोठे राजकीय नेते. आपल्याच गोटातील दोन माणसांनी मतं फिरवल्यामुळे टायगर नगरसेवक म्हणून निवडून आला हे शल्य घेऊन वावरणाऱ्या अण्णांनी गल्लीतील कार्यकर्त्यांना हाताशी धरलं आहे. टायगरचा भाऊ बाल्या आणि त्याची गँग तर अण्णांच्या गोटातील अध्यक्ष आणि त्याचा खास मित्र सनी यांच्याभोवती प्रामुख्याने ही कथा फिरते. गणेशोत्सवात कोणाचा गणपती मिरवणुकीत पुढे जाणार? यावरून दोन गटांमध्ये वादाची ठिणगी पडते. अण्णासाठी काम करणारा गणपती मंडळाचा अध्यक्ष हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. सध्या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आणि मग हळूहळू पक्षात आपली पत वाढवत निवडणुकीसाठी उभं राहण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. तर अध्यक्षाला मदत करणारा सनीही पुढे पक्षात आपल्याला मोठं स्थान मिळेल आणि आयुष्य स्थिरस्थावर होईल या आशेवर आहे. हे दोघेही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. अण्णांच्या प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार आहे. मात्र टायगर आणि अण्णा या शह-काटशहाच्या राजकारणात हे सगळेच कार्यकर्ते मोहऱ्यासारखे खेळवले जातात. आपला वापर करून घेतला गेला आहे याची जाणीवच मुळी त्यांना होत नाही. आपण राजकीय पक्षात आहोत, आपली वट फार वपर्यंत आहे ही अंधश्रद्धा आणि प्रत्येकवेळी दोन गटांत राडा झाल्यावर पोलिसांना मॅनेज करणारा आपला नेता आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही हा त्यांचा भाबडा विश्वास.. या दोन्ही गोष्टी त्यांना या दलदलीत अधिकच आत ओढत नेतात. अरेला कारे केल्याशिवाय दुसऱ्या गटावर हावी होता येत नाही हा तरुण उसळत्या रक्ताच्या डोक्यातला राग.. याच रागाचा वापर करून त्यांच्याकडून अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. करणारे नामानिराळे राहतात आणि जीव मात्र यांचा जातो.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या या राजकीय तमाशाचे यथार्थ चित्रण करताना स्वत:ला कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या तरुणांचं भावविश्व, त्यांचे विचार-कृती, आशा-अपेक्षा आणि वास्तवातला खेळ असे नानाविध कंगोरे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी रंगवले आहेत.

‘चौक’ हा त्यांचा दिग्दर्शकीय पदार्पण असला तरी चित्रपटाची प्रभावी तांत्रिक मांडणी आणि कथेपासूनच सादरीकरणापर्यंत असलेली पकड पाहता त्यात कुठेही हे पहिलेपण जाणवत नाही. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी देवेंद्र गायकवाड यांनी सांभाळली आहे, त्यामुळेच कदाचित आपल्याला चित्रपटातून काय सांगायचं आहे याबाबत असलेली सुस्पष्टता ठायीठायी जाणवते. कलाकारांची निवड करतानाही दिग्दर्शकाने अत्यंत हुशारीने केली आहे. उपेंद्र लिमये आणि प्रवीण तरडे हे दोन अनुभवी कलाकार आणि त्यांच्या जोडीला तरुण कलाकारांची फौज म्हणून अक्षय टांकसाळे, शुभंकर एकबोटे आणि किरण गायकवाडसारख्या तुलनेने नवीन चेहऱ्यांची केलेली निवड चित्रपटाला एक वेगळा तजेला देऊन जातो. प्रवीण यांनी साकारलेला बेरकी अण्णा आणि उपेंद्रचा खाऊन टाकेन म्हणून घाबरवणारा टायगर दोन्ही व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तम उतरल्या आहेत. अक्षय टांकसाळेने साकारलेली बाल्याची भूमिका लक्षवेधी आहे. शुभंकर आणि किरण या दोघांनीही त्यांच्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. काही जाणूनबुजून मारलेले पंचेस, अनेक व्यक्तिरेखांचं कडबोळं, रमेश परदेशी यांचा पोलीस म्हणून मध्येमध्ये अचानक उफाळून येणारा तडफदारपणा, उथळ गाणी अशा मनोरंजनाचा मसाला म्हणून काही परिचित गोष्टी यातही आहेत. मात्र त्याचा चित्रपटावर फार वाईट परिणाम होत नाही. सद्य:स्थितीत आजूबाजूला असणारी राजकीय परिस्थिती आणि समाजमाध्यमांवरून उथळपणे राजकीय भूमिकेच्या नावाखाली बेधडक विधानं करणारी तरुणाई पाहता ‘चौक’सारखा या एकूणच बजबजपुरीकडे लक्ष वेधणारा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.

चौक

दिग्दर्शक – देवेंद्र गायकवाड

कलाकार – प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड, अक्षय टांकसाळे, संस्कृती बालगुडे.