scorecardresearch

सिनेमागृह नाटय़गृहे लवकरच सुरू

दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात

(संग्रहित छायाचित्र)
जवळपास सहा महिन्यांपासून सिनेमागृह/नाटयगृहांचा बंद पडदा लवकरच उघडणार आहे. राज्यातील सिनेमागृहआणि नाटयगृह सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी सिनेमागृह मालकांना दिली.

सह्य़ाद्री अतिथिगृह येथे मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत देशमुख यांनी ही ग्वाही दिली. बैठकीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनिषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात तर  उदय टॉकीजचे नितीन दातार, सेंट्रल सिनेमाचे शरद जोशी, कस्तुरबा सिनेमाचे निमिश सोमय्या, न्यू शिरीनचे विराफ वच्छा, आशा सिनेमाचे तेजस करंदीकर तर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे दिपक अशेर, मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्सचे आयनॉक्सचे अलोक टंडन, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, सिनेपॉलिसचे देवांद संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, युएफओचे कपिल अग्रवाल, राहूल हसकर, राम निधानी आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, उपहारगृह, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सिनेमागृहे/नाटयगृहे मात्र बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. येणारा काळ हा सिनेमागृहे सुरु करण्यास चांगला असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cinema theaters open soon abn