पंडीत जसराज यांना ‘ शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१३’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते पंडीत जसराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील शण्मुखआनंद सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजीत पवार, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे उपस्थित होते.
पंडीत जसराज यांना यापूर्वी पद्मविभूषण या किताबासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार,  लता मंगेशकर पुरस्कार,  महाराष्ट्र गौरव पुरस्कार,  मारवाड संगीतरत्न आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शिरपेचात आता ‘भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव’ या पुरस्काराचा तुरा रोवला गेला आहे.