|| नीलेश अडसूळ

गेली दीड वर्षे नाट्यगृहाचे बंद असलेले दार उघडून नाटकाची तिसरी घंटा कधी वाजणार, याकडे समस्त मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागलेले असताना, नाटकाआधी वादाचीच तिसरी घंटा वाजवून नवे नाट्य मराठी रंगभूमीवर सुरू झाले आहे. तसे हे नाट्य जुनेच आहे. फक्त त्याचा पुढचा अंक सुरू झाला इतकेच. तो सुरू होण्यालाही ना नाही, पण ही वेळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी भांडण्याची आहे का, याचे भान रंगकर्मींना असायला हवे, असे वाटते. कारण रंगमंच कामगारांसह एकूणच नाट्यसृष्टीपुढे अनेक भीषण प्रश्न असताना वादाची तिसरी घंटा ऐकायला मिळणे हे त्या रंगभूमीचे दुर्भाग्यच म्हणायला हवे…

 २२ ऑक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्याची घोषणा झाली असली तरी ही घडी सुरळीत व्हायला वेळ लागणार आहे. अशा वेळी सर्वांनी एकी दाखवणे महत्त्वाचे आहे. नेमक्या अशाच महत्त्वाच्या क्षणी नाट्यसृष्टीची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत काही नियामक मंडळ सदस्यांनी गेल्या टाळेबंदीतच विरोध सुरू केला होता. रंगकर्मींना वाटलेला निधी, पैशांचे हिशोब आणि अनेक वाद-प्रतिवाद झाले. या वादाचा स्फोट होऊन काही नियामक मंडळ सदस्यांनी एकी दाखवत बहुमताद्वारे उपाध्यक्षपदी असलेल्या नरेश गडेकर यांना अध्यक्ष केले. यामध्ये विश्वस्त म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी न्याय करावा अशी दोन्ही बाजूंची इच्छा होती, पण तसे झाले नाही. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घटनाबाह्य कृती करत असल्याचे आरोप केले. आता नेमके घटनेला धरून कोण आहे, कुणाची बाजू योग्य आहे याचा निवडा ४ ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांपुढे होणार आहे. धर्मादाय आयुक्त काय निर्णय देणार याची प्रतीक्षा सर्वांना असतानाच विश्वस्तांनी दिलेल्या पत्रानंतर अध्यक्षपदाचा वाद पुन्हा सुरू झाला.

नाट्य परिषदेच्या कलम १७(१) नुसार ७ विश्वस्त आणि २ पदसिद्ध असे एकूण ९ विश्वस्त परिषदेवर असणे अपेक्षित आहे. सध्या सातपैकी केवळ तीन जागा भरलेल्या असून चार पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू व्हावी यासाठी शरद पवार आणि शशी प्रभू या तहहयात विश्वस्तांनी नरेश गडेकर यांना १३ सप्टेंबरला पत्र दिले. या पत्रात अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांचा उल्लेख केल्याने या वादाला तोंड फुटले. या जागा त्वरित भरण्यासाठी कार्यकारी समिती आणि नियमक मंडळाची सभा तातडीने घ्यावी, असे आदेशही गडेकर यांना या पत्राद्वारे देण्यात आले.

घटनेनुसार अशा बैठका आयोजित करणे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्या अधिकाराखाली येते. असे असताना अध्यक्षांचा तेही नरेश गडेकर यांचा उल्लेख का आला, असा प्रश्न दुसऱ्या म्हणजे कांबळी गटातील रंगकर्मींना पडला आहे. ‘गडेकर अध्यक्ष आहेत का याचा निवाडा अजून झालेला नाही. त्यांच्याकडे बदल अर्ज नाही. मग अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारणे योग्य आहे का, तसेच त्यांनी दिलेले एकही पत्र नाट्य परिषदेच्या अधिकृत लेटरहेडवर नाही, मग ते ग्राह्य धरावे का,’ असा आक्षेप कांबळी यांनी या पत्रानंतर नोंदवला.

गंमत म्हणजे नरेश गडेकर यांच्या निवडीनंतरही करोनासंदर्भात जेवढ्या शासकीय बैठका झाल्या त्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रसाद कांबळी यांना बोलावण्यात आले होते. एकीकडे राज्य सरकार प्रसाद कांबळी यांच्याशी अध्यक्ष म्हणून संवाद साधत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र नरेश गडेकर यांना अध्यक्ष म्हणून संबोधल्याने गुंता अधिक वाढला.

शरद पवार यांनी गडेकरांना अध्यक्ष म्हणून का संबोधले, त्यांना गडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे होते का, त्यांनी दुसरी बाजू समजून घेतली का, अशा अनेक शंका या पत्रानंतर उपस्थित झाल्या.

शरद पवारांनी दिलेल्या पत्रानंतर नरेश गडेकर यांनी अध्यक्ष म्हणून १४ सप्टेंबर रोजी माध्यमांना पत्र दिले ज्यामध्ये प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे आणि अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शरद पोंक्षे घटनाबाह्य कृती करत असून विश्वस्तांची दिशाभूल करत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

या पत्रानंतर १६ सप्टेंबर रोजी शरद पोंक्षे यांनीही गडेकर यांना पत्र दिले. ‘आपण पत्रात दिलेला मजकूर खोडसाळ आणि दिशाभूल करणारा आहे, हे येत्या सात दिवसांत निदर्शनास आणून दिले जाईल,’ असा इशारा पोंक्षे यांनी दिला. त्यानुसार पाच दिवसांतच २१ सप्टेंबर रोजी पोंक्षे यांनी गडेकरांना पत्र दिले.

नरेश गडेकर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांतील कार्यकारी समितीच्या बैठकांना अनुपस्थित असल्याने घटनेनुसार त्यांचे कार्यकारिणी सदस्यत्व आपोआपच रद्द झालेले आहे. हा बदल धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे गडेकर अध्यक्ष होऊ शकत नाहीत, असा पहिला खुलासा पोंक्षे यांनी या पत्रात केला आहे. तसेच विशेष नियामक मंडळ सदस्यांच्या बैठकीत नरेश गडेकर यांना दिलेल्या अध्यक्षपदाचा बदल अर्जही अद्याप धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केलेला नाही. त्यामुळे ‘अध्यक्ष’ म्हणून अहवाल देणे, सभा भरवणे यांचा अधिकार गडेकरांना नाही, तसे त्यांनी करू नये, अन्यथा फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल, असेही पत्रात नमूद के ले आहे.

विशेष म्हणजे विश्वस्तांची कृतीही घटनाबाह्य असल्याचा आरोप पोंक्षे यांनी केला आहे. ‘अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह पदसिद्ध विश्वस्त असल्याने प्रसाद कांबळी आणि मी स्वत: अद्याप विश्वस्त आहोत. त्यामुळे कोणत्याही निर्णयाला विश्वस्त मंडळाची मंजुरी गरजेची असते. तहहयात विश्वस्त शरद पवार आणि शशी प्रभू यांनी दिलेले निर्देश विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पारित झाले नसल्याने तेही घटनाबाह्य ठरतात,’ असे पोंक्षे यांनी म्हटले आहे.

या पत्रांचे निखारे धगधगते असतानाच अजून एक पत्र समोर आले, ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांनी ६ ऑक्टोबरला नियामक मंडळ सदस्यांची बैठक आयोजित केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या सभेस विश्वस्त शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत.

‘विश्वस्त नेमणुकीसाठी नियामक मंडळ सदस्यांची सभा घेण्याचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांना सांगूनही त्यांनी या निर्देशाचे पालन न केल्याने अध्यक्ष म्हणून मी या सभेचे आयोजन करत आहे, असे पत्र नरेश गडेकर यांनी नियामक मंडळ सदस्यांना दिले आहे. त्यानुसार ६ ऑक्टोबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट इथे नियामक सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागांसोबतच नाट्यसंकुलाचा आढावा, परिषदेच्या भावी कार्याविषयी चर्चा तसेच मागील सभेचे अतिवृत्त मंजूर करून घेण्यात येणार आहे.

अध्यक्ष पदाचा वाद सुरू असला तरी प्रमुख कार्यवाह म्हणून शरद पोंक्षेच अद्याप कारभार पाहत आहेत. त्यामुळे त्यांना तरी विश्वासात घ्यायला हवे होते अशी चर्चा नाट्यवर्तुळात आहे. ही बाब खुद्द शरद पोंक्षे यांनाही खटकली आहे. ‘वैध मार्गांनी सुरू असलेले काम बंद पाडण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशा शब्दांत त्यांनी या प्रकाराला हेटाळले आहे.

‘परिषदेवर आम्ही येण्याआधी अनेक अवैध गोष्टी सुरू होत्या. त्या सर्व गोष्टी मोडीत काढून सुशासन आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. हेच वैध मार्गांनी सुरू असलेले काम काहींना नको आहे; पण मी शेवटपर्यंत घटनेला प्रमाण मानूनच काम करणार. मी घटनेवर चालत असल्याने आता इतर लोकांना पुढे करून सभा घेतल्या जात आहेत. माझ्या आणि प्रसाद कांबळीमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला; पण तो मी हाणून पाडला. मला या लोकांबाबत खेद वाटतो, कारण एकीकडे रंगकर्मींचे जगणे बिकट झालेले असताना खुर्चीसाठी भांडण्यात हे मग्न आहेत. विशेष म्हणजे घटना, संविधान मानणाऱ्या, ज्यांचे कार्य देशाला आदर्श आहे अशा शरद पवारसाहेबांना जेव्हा घटनेविरुद्ध वागायला भाग पडले जाते तेव्हा संताप होतो. नाट्य परिषदेत सुरू असलेले गलिच्छ राजकारण किळस आणणारे आहे. आमच्या कारकीर्दीत केलेला प्रत्येक व्यवहार पारदर्शी आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. ज्यांना आमची अडचण आहे त्यांचे हेतू काही और आहेत,’ अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी आपली नाराजी व्यक्त के ली आहे.

तर विश्वस्त नेमणुकीबाबत प्रसाद कांबळी यांनी एक खुलासा केला आहे. ‘१३ जानेवारी २०१९ ला झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घटनादुरुस्ती होईपर्यंत कोणत्याही निवडणुका, नेमणुका होणार नाही असे एकमताने ठरले होते. २९ ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या विश्वस्त बैठकीत याला मंजुरीही मिळाली होती. मग घटनादुरुस्तीआधी विश्वस्त नेमण्याचा घाट का घालण्यात येत आहे? आदरणीय शरद पवार यांनी आमचीही बाजू समजून घ्यायला हवी. परिषदेतील काही सदस्य त्यांची पूर्णत: दिशाभूल करत आहेत,’ असे कांबळी यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात विशेष बैठकीत अध्यक्ष झालेले नरेश गडेकर यांनी कांबळी आणि पोंक्षे यांच्यावर माझे कोणतेही आरोप नसल्याचे म्हटले आहे. ‘मी कधीही कोणावर वैयक्तिक आरोप केले नाही, तो माझा स्वभाव नाही. कांबळी यांच्यावर झालेले आरोप सतीश लोटके यांनी केले असून त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. नियामक मंडळ सदस्य म्हणून मी विशेष बैठकीस उपस्थित होतो. त्यानुसार बहुमताने मला अध्यक्ष केले, जे मी मान्य केले. लोकशाहीत बहुमताला किंमत असल्याने ते सर्वांनी मान्य करायला हवे असे मला वाटते. बाकी धर्मादाय आयुक्त योग्य तो निर्णय घेतील,’ असे नरेश गडेकर यांनी सांगितले.

६ ऑक्टोबरला विश्वस्तांच्या हजेरीत नियामक मंडळ सदस्यांची बैठक असली तरी ४ ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांची सुनावणी आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरपेक्षा ४ तारखेच्या घडामोडी अधिक निर्णायक ठरणार आहेत. कोण घटनेला धरून आहे आणि कोण घटना मोडीत काढत आहे हे लवकरच उघड होणार आहे; पण… त्याआधी काही नवे वाद, नव्या गोष्टी बाहेर पडल्या तर पुढे काय होईल, ते रंगभूमीच जाणो…