Jana Nayakan Release Date Update : जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. थलपती विजय म्हणून सिनेविश्व गाजवल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. पडद्यावरील नायक आता तमिळनाडू राज्याची धुरा सांभाळणार आहे. राजकारणात सक्रिय झाल्यामुळे विजय आता चित्रपटांमध्ये दिसतील की नाही अशी शंका त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जोसेफ विजय यांच्या जना नायकन या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत निर्मात्यांनी अपडेट दिली आहे.
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतानाच जोसेफ विजय मोठ्या पडद्यावरही झळकणार आहेत. त्यांची मुख्य भूमिका असलेल्या जना नायकन चित्रपटाचे प्रदर्शन अडकले होते. प्रमाणीकरण प्रक्रियेतील विलंबामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता ही प्रक्रिया संपली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रविवारी (ता. १० मे) जना नायकन चित्रपटाचे निर्माते व्यंकट के. नारायण यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबतची माहिती दिली. जना नायकन चित्रपट पुढील १४ दिवसांत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता निर्मात्यांनी व्यक्त केली.
चित्रपट प्रदर्शनाला झाला विलंब
‘फिल्मीबीट’ने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रमाणपत्रीकरणाची (Certification) प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून, लवकर जना नायकन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळा’शी (CBFC) या संदर्भात चर्चा सुरू असल्याचेही निर्मात्यांनी स्पष्ट केले. जोसेफ विजय यांच्या जना नायकन या तमीळ चित्रपटाची चर्चा संपूर्ण देशामध्ये आहे. राजकारणामुळे जोसेफ विजय हे चर्चेमध्ये असताना त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रमाणपत्रीकरणाशी संबंधित काही समस्यांमुळे या प्रकल्पात विलंब झाला होता. तसेच, गेल्या महिन्यात तो ऑनलाइन लीक झाल्यामुळे आणि त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने ‘जना नायकन’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू होती.
निर्मात्यांकडून अभिनेत्याचे कौतुक
माध्यमांशी संवाद साधताना, चित्रपटाचे निर्माते व्यंकट के. नारायण यांनी जोसेफ विजय यांच्या शिस्तप्रियता आणि समर्पणाचे कौतुक केले. मुख्यमंत्री जोसेफ विजय हे दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जात असून, त्यांचे सामान्य लोकांशी प्रेमाचे नाते अतिशय घट्ट असल्याचे ते म्हणाले. चित्रपटाच्या निर्मात्याने ‘जना नायकन’ ही उपाधी, जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळनाडूमधील नव्या राजकीय पर्वाशीही जोडली आहे. तसेच आता संपूर्ण टीमचे लक्ष चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे असल्याचे निर्माते म्हणाले आहेत.
विजयसह पूजा हेगडे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत
‘जना नायकन’ हा तमीळ भाषेतील राजकीय अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असून, जोसेफ विजय यांचा सक्रिय राजकारणापूर्वी केलेला तो शेवटचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले असून, त्यामध्ये जन-आंदोलन, राजकारण आणि लोकभावना या बाबींचा समावेश असणार आहे. चित्रपटामध्ये जोसेफ विजयसह पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रियमणी, प्रकाश राज व ममिता बैजू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
