Thalapathy Vijay CM Black Suit Story : अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांच्या पोशाखाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. तामिळनाडूच्या राजकारणात नेहमी दिसणारा पारंपरिक दाक्षिणात्य पोषाख परिधान न करता याऐवजी विजय काळ्या-पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसले.
यानंतरही त्यांनी अधिकृत बैठका, सार्वजनिक कार्यक्रम आणि सरकारी समारंभांमध्ये अशाच प्रकारचे सूट परिधान केले. त्यामुळे हा काळा-पांढरा पोशाख त्यांची खास ओळख बनला. त्यांच्या या लूकची सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली आता विजय यांनी याबद्दल अखेर प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारी तिरुचिरापल्ली येथे झालेल्या तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या पहिल्या भव्य आभार सभेत विजय यांनी या विषयावर भाष्य केलं. समर्थकांचे आभार मानल्यानंतर आणि राजकीय विरोधकांवर टीका केल्यानंतर त्यांनी त्यांच्या पोशाखाबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
…म्हणून विजय फक्त काळ्या व पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात
जनसमुदायाला संबोधित करताना विजय म्हणाले, “आपल्याला कोट-सूट घालण्याची परवानगी नाही का? मी इतर रंगांचे कपडे घालत नाही. फक्त काळा आणि पांढरा हेच दोन रंग वापरतो. या रंगांची निवड करण्यामागचा हेतू म्हणजे मी माझ्या प्रत्येक कामात पारदर्शक आणि साधा राहीन, हे दाखवणे. काळ्या-पांढऱ्या रंगांप्रमाणेच माझी भूमिका स्पष्ट आणि सरळ असेल असा आहे.” विशेष म्हणजे, विजय यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात परिधान केलेला चर्चेतील काळा सूट त्यांच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या Beast या चित्रपटातील RAW एजंटच्या स्टायलिश लूकवर आधारित असल्याचं सांगितले जातं.
विजयसाठी सूट डिझाइन करणारे डिझायनर झफिर आणि शादाब यांनी विजय यांच्या शपथविधीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी लिहिले, “हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री विजय जोसेफ यांचे अभिनंदन. शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी आमच्याकडून खास तयार करण्यात आलेला काळा सूट परिधान केला. या क्षणाचा भाग होता आल्याचा आम्हाला सन्मान वाटतो.” याच सभेत विजय यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. त्यांच्या मते, सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विरोधकांनी टीका सुरू केली.
विजय म्हणाले, “आमच्या सरकारला सत्तेत येऊन अजून काही आठवडेही झालेले नाहीत. जे लोक सहा महिने शांत राहू असे म्हणत होते, ते सहा दिवसही शांत राहू शकले नाहीत. आम्ही सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी तक्रारी आणि टीका सुरू केली. तामिळनाडूच्या जनतेने अनेक वर्षे आलटून-पालटून सत्ता भोगून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन्ही पक्षांना नाकारले आहे”.
मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानताना विजय म्हणाले, “तुम्ही विजयची निवड केवळ मुख्यमंत्री म्हणून केलेली नाही, तर तुमचा मोठा भाऊ, लहान भाऊ आणि तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा प्रमुख सेवक म्हणून केली आहे. टीव्हीकेला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुमच्या या विश्वासामुळे आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल”.
