तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय शुक्रवारी सकाळी मधुरंधगम येथे निवडणूक प्रचारासाठी रोड शो करत होते. त्यावेळी एका पक्षाच्या कार्यकर्त्याने त्यांना ‘सिग्मा’मधील त्यांचा मुलगा जेसन संजयचा फोटो फ्रेम करून दिला. जेसन संजयच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विजय यांनी ती फोटोफ्रेम घेतली आणि डोक्याच्या वर उचलून धरली. त्यानंतर त्यांनी ती फ्रेम गर्दीच्या दिशेने वळवली, ज्यामुळे हजारो समर्थकांना फोटो पाहता आला.

हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला. त्यामुळे हा क्षण दिवसभरातील चर्चेतील दृश्यांपैकी एक ठरला.विजय मधुरंधगममध्ये असताना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य ‘सिग्मा’च्या फर्स्ट-डे-फर्स्ट-शोसाठी चेन्नईतील कमला सिनेमाजमध्ये उपस्थित होते. जेसनची आई संगीता सोर्नलिंगम थिएटरमध्ये पोहोचली. यावेळी त्या फोटोग्राफर्सकडे पाहून हसताना आणि त्यांना प्रतिसाद देताना दिसल्या. जेसनची बहीण दिव्या साशाने काळ्या रंगाचा ‘सिग्मा’ टी-शर्ट परिधान करून चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.त्यावेळी जेसन स्वतःही त्याच्या कुटुंबासोबत स्क्रीनिंगला उपस्थित होता.

मात्र विजय त्यांच्याबरोबर उपस्थित राहू शकले नाहीत. माध्यमांच्या वृत्तांनुसार त्यादिवशी सकाळी मधुरंधगमला रवाना होण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूमध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजनेचा शुभारंभ केला होता. त्यांच्या सरकारच्या सुरू असलेल्या कल्याणकारी उपक्रमांचा हा एक भाग आहे. रिलीजपूर्वीच्या काही दिवसांत जेसनने विजय यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, याबद्दल भाष्य केलं होतं. ‘पर्ले मानी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने विजय यांचं वर्णन लगेच प्रतिक्रिया न देता एखाद्या गोष्टीवर विचार करून मत व्यक्त करणारी व्यक्ती म्हणून केलं.

जेसन संजय वडील विजय यांच्याबद्दल काय म्हणाला?

जेसन म्हणाला, “माझे बाबा सहसा शांत स्वभावाचे आहेत. ते वेळ घेतात. मी त्यांना एखादा प्रश्न विचारला, तर उत्तर देण्यासाठी ते १० सेकंद घेतात.” विजय यांना चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर विचार करून प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ लागेल, असंही जेसनने सांगितलं. “मला वाटतं, चित्रपटाचं विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक वेळ हवा असतो. पण त्यांना चित्रपट आवडेल. त्यांना माझा अभिमान वाटेल,” असं तो म्हणाला. यापूर्वी जेसनने सांगितलं होतं की, दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याच्या त्याच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी विजय होते. “त्यांनी मला सर्वात आधी ग्रीन सिग्नल दिला, कारण ते इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे आहेत. माझ्या आई आणि बहिणीपेक्षाही त्यांना याचं महत्त्व समजलं,” असं जेसनने सांगितलं होतं.

मात्र, या पाठिंब्यानंतरही ‘सिगमा’च्या प्रमोशनपासून विजय यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं आहे. जेसनने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, हा निर्णय त्याचाच होता. तो म्हणाला, “माझे वडील माझ्या चित्रपटाचं प्रमोशन करणार नाहीत. मला प्रमोशन चित्रपटाभोवती असावं असं वाटतं, त्यांच्याभोवती नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ नयेत, असं मला वाटतं.” विजय यांनी अद्याप संपूर्ण चित्रपटही पाहिलेला नाही. जेसनने त्याच्या कुटुंबीयांना चित्रपटाची फक्त ढोबळ रूपरेषा सांगितली होती. त्यांना हा चित्रपट “एका नव्या दृष्टिकोनातून” अनुभवता यावा, अशी जेसनची इच्छा होती.

‘सिगमा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सिगमा’ने भारतात पहिल्या दिवशी १,८१३ शोमधून २.३५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. तर चित्रपटाचं भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन २.७० कोटी रुपये इतकं झालं आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्यानुसार, ही आकडेवारी समोर आली आहे.