Actor Vijay Son Jason Sanjay talks about mother Sangeetha : अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय मागील काही दिवस प्रचंड चर्चेत राहिले. पत्नी संगीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला, त्याचबरोबर त्रिशाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला केलेल्या कडक सॅल्यूटची जोरदार चर्चा झाली. अशातच संगीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्यावर तिचा मुलगा जेसन संजय पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. जेसन लवकरच दिग्दर्शक म्हणून ‘सिग्मा’ (Sigma) सिनेमातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जेसन त्याची आई संगीता आणि लहान बहीण दिव्या साशा यांच्याबद्दल भरभरून बोलला.
आई माझा सर्वात मोठा आधार – जेसन संजय
एसएस पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत जेसन संजय म्हणाला, “माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आहे. काही वेळा मी स्वतःबद्दल विचार करायला विसरत असलो, तरी ती २४ तास फक्त माझा आणि माझ्या बहिणीचाच विचार करत असते. जर मी तिला एखाद्या दिवशी फोन करू शकलो नाही, तर ती स्वतःहून फोन करते आणि मी कसा आहे हे विचारते.”
आई-वडिलांशी मैत्री नाही- जेसन संजय
आई-वडील व मुलांमध्ये एकप्रकारचा संकोच असतो. त्याबद्दल जेसन म्हणाला, “आई काय बोलेल, या भीतीने मला काही गोष्टी तिला सांगायला भीती वाटत असली, तरी आम्ही एकमेकांशी पूर्णपणे प्रामाणिक आहोत.” आई-वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल तो व्यक्त झाला. “माझं आई किंवा वडिलांशी इतकं घट्ट मैत्रीचं नातं नाही की मी त्यांना प्रत्येक गोष्ट सांगू शकेन,” असं जेसन संजयने नमूद केलं.
बहीण आहे बेस्ट फ्रेंड – जेसन संजय
पूर्ण कुटुंबात आपली लहान बहीण दिव्या साशा हीच आपली सर्वात जवळची मैत्रीण असल्याचं जेसनने सांगितलं. “माझी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आहे. लहानपणी आमची खूप भांडणं व्हायची. उंदीर-मांंजरासारखं आमचं नातं होतं. पण आता ती कॉलेजमध्ये आहे आणि मी चेन्नईत असतो. त्यामुळे आमच्यातील अंतर वाढल्यावर आम्हाला एकमेकांची जास्त आठवण येऊ लागली,” असं जेसन म्हणाला.
बहिणीबरोबरचा एक प्रेमळ किस्सा जेसनने सांगितला. “नेहमी ती मला ‘ब्रो’ (Bro) म्हणते. पण जेव्हा ती माझ्यावर रागावलेली असते, तेव्हा ती मला ‘अण्णा’ म्हणते. आमच्या घरात हा एक प्रकारचा धोक्याचा इशाराच असतो,” असं जेसन म्हणाला.
जेसन संजयचा जन्म २००० मध्ये झाला. त्याने लंडनच्या ‘SAE इन्स्टिट्यूट’मधून फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलंय. तर २००५ मध्ये जन्मलेली दिव्या साशा सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे. विजय यांनी आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवलं. मुलं लहान असताना त्यांनी फक्त विजय यांच्या काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या.
