गेली अनेक वर्षे विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत मनोरंजनसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते व ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ हे प्रदीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर परतले आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर आले आहेत.

एका तत्त्वनिष्ठ माणसाची कथा

निवृत्तीच्या वयात असलेल्या तत्त्वनिष्ठ आणि कडव्या स्वभावाच्या अशोक माधव माजगावकर यांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या कडक शिस्तीच्या आजोबांच्या आयुष्यात त्यांच्या नातवांमुळे येणारे वादळ आणि त्यामुळे त्यांच्या शिस्तप्रिय आयुष्याला मिळालेली कलाटणी असा काहीसा गंभीर आशय आणि हलकीफुलकी मांडणी असलेली कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदे हेसुद्धा उपस्थित होते.

mrunal dusanis praises husband neeraj more
लग्नानंतर चार वर्षे दूर राहिले, करिअरमध्ये साथ अन्…; दिवाळी पाडव्याला मृणाल दुसानिसने पती नीरजचं केलं कौतुक
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Rekha watches Amitabh Bachchan KBC
रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

हेही वाचा >>>५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट

‘अशोक मा. मा.’ मालिकेत विनोदाची मात्रा कमी असून ही एका तत्त्वनिष्ठ माणसाची कथा आहे. अशोक माधव माजगावकर म्हणजेच ‘अशोक मा. मा.’ यांना शिस्तीने जगायला आवडतं. आजकाल काही माणसं बेशिस्तपणे वागतात, परंतु या माणसांना शिस्त लागली तरच त्यांची पुढे भरभराट होईल, या तत्त्वाचा तो माणूस आहे. या माणसाच्या आयुष्यात जी वेगवेगळी स्थित्यंतरं घडत जातात, ते सर्व प्रेक्षकांना ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘मला एखाद्या माणसाच्या आयुष्यातील निरनिराळे कंगोरे दाखवायला छान व मजेशीर वाटते. मला या मालिकेच्या कथानकात वेगळेपणा जाणवला म्हणून मी काम करण्यासाठी होकार दिला’, अशी स्पष्टोक्ती अशोक सराफ यांनी दिली.

मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर असून अभिनेत्री रसिका वाखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते, शुभवी गुप्ते हे कलाकारदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर केदार वैद्या हे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

प्रेक्षकांना खिळवून ठेवणं महत्त्वाचं

एखाद्या मालिकेत काम करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवणं महत्त्वाचं असतं. कथानकावरील आणि प्रेक्षकांवरील तुमची पकड शेवटपर्यंत सुटता कामा नये. दैनंदिन मालिका मी कधी केली नव्हती, त्यामुळे ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत काम करणं हा माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. ‘हम पाँच’सारख्या मी आधी केलेल्या मालिका या आठवड्यातून एकदाच प्रसारित व्हायच्या. आता दैनंदिन मालिकेत काम करताना रोजच्या रोज त्या पात्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कथानकात घुसणं हीच साधना ठरते आहे. वेगळं काही करावं लागत नाही, असं अशोक सराफ यांनी सांगितलं. तुमची विचारप्रक्रिया सतत चालू असणं आवश्यक असून संहिता वारंवार वाचली पाहिजे. तुमचं लक्ष विचलित झालं आणि कुठेतरी भरकटलात, तर तुम्ही मालिकेपासून दूर जाता. कोणतेही पात्र हे वेगवेगळ्या पद्धतीने रंगवता येतं आणि तुमचं पात्र हे इतर सहपात्रांशी जुळवता आलं पाहिजे. प्रत्येक शब्द, वाक्य आणि लुकला महत्त्व आहे, या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे जुळवून आणल्यास मालिका परिपूर्ण होईल, असंही त्यांनी संगितलं.

हेही वाचा >>>“दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो मला…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किसिंग सीनचा धक्कादायक अनुभव

काळानुसार विनोदाची शैली बदलते…..

‘आजवर अनेक विनोदी भूमिका साकारल्या आणि काही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरल्या. परंतु विनोद करण्याचं एक वय असतं, काळानुसार विनोदाची शैलीही बदलत जाते. मी तरुणपणी ज्या पद्धतीने विनोदी भूमिका साकारल्या, त्या शैलीतील विनोदी भूमिका सध्याच्या वयात करणं शक्य नाही. मात्र पूर्वीच्या बाजात विनोदी लेखन केलं गेलं, तर तशी भूमिका करणं शक्य होईल’ असं सांगतानाच या मालिकेत खळखळून हसवणारे नव्हे तर नर्मविनोदी संवाद आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून मालिकेला हे नाव…

‘अशोक मा. मा.’ या मालिकेत ओढूनताणून विनोद नाहीत. तसंच, अशोक सराफ हे विनोदी कलाकार म्हणून दिसत नाहीत, ते आजोबा म्हणून पाहायला मिळत आहेत. ते बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आले असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकताही आहे. या मालिकेला कोणतंही वेगळं नाव दिलं असतं, तरीही अशोक मामांची मालिका पाहिली का? अशीच चर्चा प्रेक्षकांमध्ये होणार. त्यामुळे ‘अशोक मा. मा.’ हे मालिकेचे नाव ठेवलं, जेणेकरून प्रेक्षकांना बोलताना सोपं जाईल आणि त्यांच्याकडून मौखिक प्रसिद्धीही होईल. अशोक मामा यांना मालिकेत काम करताना पाहणं हे नव्या पिढीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे, असं केदार शिंदे म्हणाले.

(शब्दांकन : अभिषेक तेली)