scorecardresearch

पाहताक्षणीच पत्नीच्या प्रेमात पडले होते राजू श्रीवास्तव, १२ वर्ष होकाराची वाट पाहिली अन्…

राजू श्रीवास्तव १७ मे १९९३ रोजी शीखा यांच्यासह विवाहबंधनात अडकले. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.

पाहताक्षणीच पत्नीच्या प्रेमात पडले होते राजू श्रीवास्तव, १२ वर्ष होकाराची वाट पाहिली अन्…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते एक उत्तम अभिनेता आणि राजकारणीदेखील आहेत. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमधून ते घराघरात पोहोचले. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली.

राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं आहे. गजोधर आणि राजू भैया म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदांप्रमाणेच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला होता. पत्नीचा होकार मिळवण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्ष वाट पाहावी लागली होती. राजू यांच्या पत्नीचं नाव शिखा श्रीवास्तव असं आहे. मोठ्या भावाच्या लग्नात पहिल्यांदाच दोघे एकमेकांना भेटले. शिखा यांना पाहता क्षणीच राजू भैया त्यांच्या प्रेमात पडले होते. तेव्हाच त्यांनी शिखा यांच्याशीच लग्न करण्याचा निर्धार पक्का केला होता.

हेही वाचा : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

शिखा यांच्याबद्दल माहिती मिळवल्यानंतर त्या त्यांच्या वहिनीची चुलत बहीण असल्याचं समजलं. तेव्हा त्या उत्तर प्रदेशातील इटावा शहरात राहत होत्या. राजू भैया यांनी सुरुवातीला शिखा यांच्या भावाशी जवळीक साधून त्यांना विश्वासात घेतलं. काही ना काही कारणाने ते शिखा यांच्या घरी जाऊ लागले. परंतु, आपल्या मनातील भावना शिखा यांना बोलून दाखवण्याचं त्यांना धाडस झालं नाही.

हेही पाहा : बर्थ डे पार्ट्यांमध्ये ५० रुपयांसाठी काम करायचे राजू श्रीवास्तव, एक शो मिळाला अन्…

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे असल्यास केवळ प्रेम नाही तर पैसेही महत्त्वाचे आहेत, हे उमगल्यावर राजू श्रीवास्तव यांनी १९८२ साली मुंबई गाठली. अपार मेहनत आणि कलेच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. यामधल्या काळात चिट्ठीद्वारे ते शिखा यांच्याबरोबर संपर्कात होते. परंतु, त्यांनी कधीही त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं नाही. शिखा यांचं लग्न झालेलं नाही याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांद्वारे त्यांना लग्नाची मागणी घातली. त्यानंतर शिखा यांच्या भावाने राजू भैया यांची मालाड येथील घरी येऊन भेट घेतली. सगळं नीट आहे याची खात्री पटल्यानंतर शिखा यांनी राजू यांच्यासह लग्न करण्यासाठी होकार दिला. १७ मे १९९३ रोजी ते विवाहबंधनात अडकले. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comedian actor raju shrivastav wife shikha shrivastav filmy lovestory know about his family kak

ताज्या बातम्या