Samay Raina Breaks Silence On India’s Got Latent Show Controversy : स्टॅण्ड-अप कॉमेडियन समय रैनाने जवळपास एक वर्षानंतर त्याच्या ‘स्टिल अलाइव्ह’ (Still Alive) या नवीन शोमधून कमबॅक केले आहे. या शोमध्ये त्याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या शोमध्ये केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर समयवर तीन गुन्हे (FIR) दाखल झाले होते. त्या काळात मानसिक स्थिती इतकी बिघडली होती की, मी ‘सायकोसिस’ (Psychosis) या अवस्थेत गेलो होतो, असा धक्कादायक खुलासाही त्याने केला.

समय म्हणाला, “जानेवारी २०२५ पर्यंत माझे आयुष्य खूप छान सुरू होते. माझ्या प्रत्येक व्हिडीओला पाच ते सहा कोटी व्ह्यूज मिळायचे. प्रत्येक पॉडकास्टमध्ये माझीच चर्चा असायची, सेलिब्रिटींना मला भेटायचे होते आणि इतर कॉमेडियन्सना माझा हेवा वाटायचा. मी अक्षरशः राजासारखे आयुष्य जगत होतो.” त्याच काळात समयने त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या अमेरिका दौऱ्याची (US Tour) घोषणा केली होती, ज्याची ५०,००० तिकिटेही विकली गेली होती. अमेरिकेला जात असताना विमानातच त्याने रणवीर अलाहाबादियाचा तो भाग एडिट केला होता, जेणेकरून दौऱ्यात कोणतेही टेन्शन राहणार नाही. व्हिडीओ शेअर केल्यानंतर पहिल्या दिवशी काही झाले नाही; पण दुसऱ्या दिवसापासून प्रचंड ट्रोल, टीका आणि विरोध सुरू झाला. 

“… तर माझे तब्बल ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले असते”

जेव्हा समय अमेरिकेतील सिअॅटलमध्ये त्याच्या पहिल्या शोसाठी पोहोचला, तेव्हा त्याला या वादाची तीव्रता समजली. समय म्हणाला, “जर मला भारतात परत बोलावले असते, तर मला हा दौरा रद्द करावा लागला असता. माझ्या टीमने हिशोब केला होता की, मला आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. ती माझ्या आयुष्याची संपूर्ण पुंजी होती, ज्यातून मला घर बांधायचे होते; पण त्या एका वादामुळे सर्व काही संपण्याची भीती निर्माण झाली होती.”

“शोपूर्वी पॅनिक अटॅक व जीवे मारण्याच्या धमक्या आल्या”

या मानसिक तणावामुळे समयला शो सुरू होण्यापूर्वी प्रचंड अस्वस्थ वाटू लागले होते. त्याला घाम सुटला होता, हृदयाचे ठोके वाढले होते आणि श्वास घ्यायला त्रास झाला होता. त्याच्या थेरपिस्टने त्याला स्टेजवर न जाण्याचा सल्लाही दिला होता; पण समयने शो रद्द केला नाही. शो संपल्यानंतर त्याने फोन पाहिला, तर त्याचा नंबर लीक झाला होता. त्याला अनोळखी लोकांकडून शिवीगाळ आणि आई-वडिलांच्या फोटोंसह जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर २०,००० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या होत्या.

“महाराष्ट्र, जयपूर व आसाममध्ये माझ्यावर गुन्हे दाखल झाले”

स्वतःला या तणावातून बाहेर काढण्यासाठी समय एका कॅसिनोमध्ये गेला. तिथे समजले की, त्याच्यावर महाराष्ट्र, जयपूर व आसाममध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. तो म्हणाला, “मी इतका घाबरलो की, मुख्यमंत्री, राजकारणी आणि मीडिया माझ्याविरोधात आहेत यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझे अनेक चाहतेही माझ्या विरोधात गेले होते. माझ्यावर मीम्स बनले होते. देवा शप्पथ, मला वाटत होतं की, हे स्वप्न आहे, खरं नाहीये. आजूबाजूच्या वस्तू खऱ्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांना स्पर्श करीत होतो. त्यालाच ‘सायकोसिस’ म्हणतात. मी खूप घाबरलो होतो.” भारतात परतल्यानंतर समयला सर्वोच्च न्यायालयातही हजर व्हावे लागले होते. या वादामुळे त्याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग डिलीट केले.

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा नेमका वाद काय होता?

२०२५ मध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका भागात रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांबाबत एक अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिया, आशीष चंचलानी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.