सुनीलची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट!

यापुढे मला भावनांचे महत्त्व जाणणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यातच राहायचंय

सुनील ग्रोवर

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर टेलिव्हिजन विश्वामध्ये या दोघांविषयीच्या बऱ्याच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. आरोप, प्रत्यारोप, पश्चाताप आणि हा माझा मार्ग एकला… अशाच काहीशा परिस्थितीचा सामना सध्या कपिल आणि सुनील करत आहेत. कपिलचे उद्दाम वागणे आणि सहकलाकारांना त्याने दिलेली वागणूक पाहता ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे आधारस्तंभ समजले जाणारे सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी त्याच्या शोची साथ सोडली आहे.

विविध चर्चांच्या या वातावरणात मौन पाळलेल्या सुनील ग्रोवरने ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी एक संदेश पोस्ट केला आहे. ट्विटरवरील सुनीलची ही पोस्ट पाहता त्याच्याविषयी असलेला आदर आणखीनच वाढत असल्याची भावना त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली. ‘आतापर्यंत मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी आज जे काही ते सर्व तुमच्या प्रेमापोटीच. मला आता फक्त चांगलेच काम करायचे असून, माझ्या भावनांचे महत्त्व जाणणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहायचे आहे.’ असे सुनीलने या पोस्टमध्ये लिहिले आहे. झालेल्या सर्व प्रकारानंतर काही काळासाठी या क्षेत्रातील माझ्या भवितव्याची चिंता वाटत होती असेही सुनीलने या पोस्टमध्ये लिहिले आहे. चाहत्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी सुनीलने ही पोस्ट लिहिली आहे.

सध्या सुनील ग्रोवर आणि कपिलच्या शो मध्ये काम करणारे विनोदवीर अली असगर, चंदन प्रभाकर यांचा कपिलसोबत काम करण्याचा मनसुबा दिसत नाहीये. कपिलनेही या कलाकारांच्या अनुपस्थितीतच कार्यक्रमाचा गाडा पुढे नेण्याचे ठरवत काही भागांचे चित्रिकरणही केले. त्यासाठी त्याने राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि एहसान कुरेशी या विनोदवीरांना कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. पण, त्यांची उपस्थिती प्रेक्षकांना फारशी रुचली नाही. त्यामुळे युट्यूबवर पोस्ट केलेल्या ‘द कपिल शर्मा शो’च्या या भागाला पसंत करणाऱ्यांपेक्षा नापसंत करणाऱ्यांचा आकडा दुप्पट असल्याचे दिसते.

एकीकडे कपिलच्या कार्यक्रमाचे अस्तित्व धोक्यात असतानाच दुसरीकडे सुनील ग्रोवर एक नवी सुरुवात करु पाहतोय. १ एप्रिलला सुनील दिल्लीमध्ये एक लाइव्ह परफॉर्मन्स सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सुनीलने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन यासंबंधीची पोस्ट केली होती. या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये किकु शारदा त्याला साथ देणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Comedian sunil grover wrote an emotional message for his fans

ताज्या बातम्या