युट्युबवरील चॅनल ‘एआयबी’मधील विनोदवीर उत्सव चक्रवर्ती याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्सवने अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील फोटो पाठविल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
उत्सववर आरोप करणाऱ्या महिलेचं नाव महिमा कुकरेजा असं असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे उत्सव अल्पवयीन मुलींकडे त्याचे न्युड फोटो मागत असे. इतकंच नाही तर त्याने स्वत: चे काही आक्षेपार्ह फोटोही मला पाठविले होते, असं महिमा यांनी म्हटलं आहे. महिमा यांच्या ट्विटनंतर अनेक अल्पवयीन मुलींनीदेखील त्याचा अनुभव शेअर केला असून उत्सववर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
Saw this on my tl. Interesting for you to comment on how Indian men harass women
— Mahima Kukreja (@AGirlOfHerWords) October 4, 2018
उत्सवने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ‘ज्या व्यक्तींना मी ओळखत होतो. अशा ओळखीच्या व्यक्तींनीही माझ्याविरोधात आरोप केले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आणि खोटे आहेत. मी लवकरच माझी सत्याची बाजू समोर आणेन पण तोपर्यंत मी या विषयावर मौन बागळणं जास्त पसंत करेन, असं उत्सवने म्हटलं आहे.
दरम्यान, उत्सव चक्रवर्तीवर झालेल्या आरोपांची दखल घेत ‘एआयबी’ चॅनलने एक पत्रक जारी करत याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत चॅनलवरील उत्सव चक्रवर्तीचे सर्व व्हिडिओ काढून टाकणार असल्याचं म्हटलं आहे.