‘कुणी निंदा, कुणी वंदा, आमुचा हसविण्याचा धंदा’ हे प्रशांत दामले यांनी आपल्यापुरते (बहुधा) ठरवून टाकलेले दिसते. त्यामुळे सभोवतालचे वास्तव आणि त्याचे नाटकांतून उमटणारे प्रतिबिंब वगैरेशी त्यांना देणंघेणं नाही. दैनंदिन तापत्रयांनी शिणलेल्या, त्यातून चार घटका सुटकारा मिळवू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपल्याला नाटक करायचं आहे, हे दामले यांना पक्के ठाऊक आहे. म्हणूनच ‘चंद्रलेखा’ निर्मित ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’ या त्यांच्या नव्या नाटकातही त्यांनी ‘हसविण्याचा आपुला धंदा’ चालू ठेवला आहे. वैभव परब लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित ही एक ‘मॅड’ कॉमेडी आहे.
मधू आणि चंद्रकांत या जोडप्याचा उदरनिर्वाह पापड-लोणच्याच्या घरगुती व्यवसायावर कसाबसा चाललेला आहे. त्यात आणखी मधूचा रिकामटेकडा, आगाऊ भाऊ बाब्या त्यांच्याचकडे मुक्काम ठोकून आयतं गिळत असतो आणि वर भावोज्यालाच भलंबुरं सुनावत असतो. त्यामुळे चंद्या पार हैराण झालेला आहे. बाब्याला घराबाहेर काढण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. पण मधूच भावाला पाठीशी घालत असल्याने त्याचा नाइलाज होतो. ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ असा मेव्हणा मिळाल्याने चंद्याचा संसार डबघाईला आलेला आहे. अशा संसारात बाळाला जन्म देण्याचा ते विचारही करू शकत नाहीत.
अशात एके दिवशी बाब्या ‘निरभवणे’नामक एका विक्षिप्त प्राण्याला खाणावळी म्हणून घेऊन येतो. त्याच्या खाणावळीच्या पैशांतून आपलंही ‘पोट’ सुटेल, असा युक्तिवाद तो करतो. पण चंद्याला असली नस्ती बिलामत घरात अजिबात नको असते. तो खाणावळी ठेवायला साफ नकार देतो. परंतु मधूचा अत्याग्रह आणि खा6णावळी म्हणून आलेल्या निरभवण्याने केलेली दमबाजी यामुळे शेवटी तो थोडय़ा दिवसापुरता त्याला खाणावळी म्हणून ठेवायला राजी होतो.
पण आल्या दिवसापासून निरभवणे मधूला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू करतो. चंद्या नवरा म्हणून कसा नालायक आहे, हे तिच्या मनावर बिंबवण्यास सुरुवात करतो. भोळीभाबडी मधूही त्याच्या गोड गोड बोलण्याला फसून त्याच्या जाळ्यात अडकत चालल्याचं चंद्याला डोळ्यांदेखत दिसत असूनही आदळआपट करण्याखेरीज तो काहीच करू शकत नाही. बाब्याही निरभवणेचीच कड घेऊन आपल्याला हा नवा ‘भावोजी’ चालेल, म्हणतो. तशात चंपाकली नावाची एक तमासगिरीण चंद्याच्या घरात घुसते आणि आपण चंद्याची ‘एक्स-गर्लफ्रेंड’ असल्याचा बॉम्ब टाकते. त्यामुळे मधू आणखीनच बिथरते. निरभवणे आगीत आणखी तेल ओतून मधूला चंद्यापासून घटस्फोट घेऊन आपल्याशी लग्न करण्यास राजी करतो.सर्व बाजूंनी कोंडी झालेला चंद्या यातून कसा मार्ग काढतो, हे चाणाक्ष वाचक तर्काने नक्कीच समजू शकतील. असो.
वैभव परबलिखित ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’ हे नाटक तर्काला आणि कार्यकारणभावाला सोडचिठ्ठी देऊन पाहायचंय, अशी एकदा मनाशी खूणगाठ बांधून घेतली तरच ते आपलं मनोरंजन करू शकतं. दिग्दर्शक संतोष पवार हे ‘पाली’ची ‘मगर’ करण्यात मास्टर असल्याने त्यांनी या ‘मॅड’च्यॅप कॉमेडीतही ‘आपल्या’ पद्धतीनं रंगत भरण्याचा प्रयत्न केला आहे. यातलं एकमेव ‘नॉर्मल’ पात्र आहे; ते म्हणजे चंद्याचं! अन् ही भूमिका दस्तुरखुद्द संतोष पवारच करतात. अमिताभ बच्चन जसा बिनडोक चित्रपटातही आपल्या करिष्म्याने प्राण फुंकतो, तद्वत संतोष पवार यांनी या बिनडोक नाटकात जान ओतण्याची शिकस्त केली आहे.  प्रत्येक कलाकाराकडून खणखणीतपणे काम करवून घेण्याबद्दल तर संतोष पवार माहीरच आहेत. त्यामुळे त्या आघाडीवर शंभरपैकी दोनशे गुण मिळवत त्यांनी या अतक्र्य, अविश्वसनीय नाटकाचा यशस्वी डोलारा उभा केला आहे आणि सरतेशेवटी या सगळ्यांचं खापर ‘रिअ‍ॅलिटी शो’वर फोडून ते मोकळे झाले आहेत. वर ‘इडियट बॉक्स’चाही रोष पत्करावा लागू नये म्हणून (प्रश्न पोटापाण्याचा आहे!) अखेरीस बिनडोक प्रेक्षकांनाही या पापाचे वाटेकरी बनवत त्यांनी ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याचा प्रयत्नही केला आहे.
प्रशांत दामलेंचं नाटक म्हणजे त्यांच्याभोवतीच फिरणार, हे प्रेक्षकांनी आता मुकाट स्वीकारलेलं असल्यानं हेही नाटक त्याला अपवाद नाही. निरभवणेच्या प्रमुख भूमिकेत त्यांनी आपला नित्याचा चोख परफॉर्मन्स दिला आहे. कविता मेढेकर यांनी घाटी बोलीचा ठसका आणि सतत गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा फंडा झक्कास वठवला आहे. संतोष पवार यांनी ‘मधग्या.. मधग्या’ करत मालवणी बोलीचा आपल्याला झेपेल तितपतच) आविष्कार केला आहे. मालवण्यांचा तोंडफाटकेपणा मात्र त्यांनी चपखल व्यक्त केला आहे. गौरव मोरे यांचा अंतरंगी बाब्या पुरेसा राग आणतो. मुकेश जाधव यांनी छोटेखानी भूमिकंमध्येही आपली छाप सोडली आहे. पूर्वा पंडितची चंपाकली ठाकठीक!

kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
Sharad Pawar VS Ajit Pawar
“अधून-मधून वारीला जाणाऱ्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात”, रशियातील महिलेचा किस्सा सांगत शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला!
chatura article on mother marathi news
‘आई, तू ऑफिसमधल्या काकांच्या गाडीवरून घरी का आलीस?…’
Seven persons were arrested for attacking Angadia with a knife and trying to rob it Mumbai
भररस्त्यात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; अंगडियावर कोत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न, सातजणांना अटक
bjp it cell chief shweta shalini issued notice to journalist bhau torsekar
उलटा चष्मा : बूँदसे गयी वो…
A fashion show organized in Pune on the occasion of World Vitiligo Day Pune
ते आले, त्यांनी पाहिलं अन् त्यांनी जिंकलं…! पुण्यात रंगला अनोखा फॅशन शो
dili book by author suchita khallal
ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष
Suraj revanna brother of Prajjwal Revanna
प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार? आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल