बहुप्रतिक्षित असा संजू हा बायोपिक प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २९ जून रोजी प्रसिद्ध होणारा हा चित्रपट ट्रेलरमधील एका संवादावरुन वादात आला आहे. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याने हा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय दत्तची प्रमुख भूमिका करणारा रणबीर कपूर आणि पत्रकाराच्या भूमिकेत असलेली अनुष्का शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चित्रपटात संजय दत्तची मुलाखत घेत असताना अनुष्का त्याच्या गर्लफ्रेंडची संख्या विचारते. तेव्हा तो ही संख्या ३०० असल्याचे सांगतो. त्यानंतर देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचाही समावेश करु का असे विचारतो आणि त्यांना वेगळे धरु असे म्हणत तो आकडा ३५० लिहा असे पत्रकार असलेल्या अनुष्काला म्हणतो. या चित्रपटात रणबीर आणि अनुष्काबरोबरच इतरही अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. त्यात सोनम कपूर, दिया मिर्झा, परेश रावल, मनिषा कोईराला यांचा सहभाग आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल कमिशन ऑफ वूमनला याबाबतच्या तक्रारीचे पत्र आले आहे. यामध्ये रणबीर कपूर बोलत असलेले वाक्य हे देहविक्री करणाऱ्यांचा अपमान करणारे आहे असे म्हटले आहे. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या गौरव गुलाटी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यात रणबीरचे दोन संवाद उदाहरणादाखल देण्यात आले आहेत.

या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून संजूबाबाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्साही वातावरणात २५ जूनपासून ‘संजू’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. चाहत्यांनीही मोठ्या उत्साहात चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटाची तिकिटं खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.