गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांनी राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र त्यापूर्वी त्या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामुळे ते दोघेही अडचणीत येणार असल्याचे बोललं जात आहे.

विकी-कतरिनाचा विवाह राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये या ठिकाणी होत आहे. हे दोघे ज्या हॉटेलमध्ये हे लग्न करणार आहेत ते हॉटेल सवाई माधोपूरमधील चौथमधील बरवाडामध्ये आहे. या ठिकाणी प्रसिद्ध चौथ माता मंदिर आहे. मात्र कतरिना आणि विकीच्या लग्नामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्याबाबत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कतरिना आणि विकीविरोधात न्यायालयात ही तक्रार सवाई माधोपूरमधील नेत्रबिंदु सिंह जादौन यांनी दाखल केली आहे. या तक्रारीत कतरिना, विकीसह सवाई माधोपूरचे कलेक्टर आणि हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवडा व्यवस्थापनालाही जबाबदार धरण्यात आले आहे.

हेही वाचा : कतरिना आणि विकीच्या लग्नात ‘चका चक’ गाण्यावर डान्स करणार का? सारा म्हणते…

राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नामुळे प्रसिद्ध चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता गेल्या ६ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या मार्गावर चौथ मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. पण रस्ता बंद ठेवण्यात आल्याने पुढील सात दिवस भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळे भाविकांसाठी चौथ माता मंदिरापर्यंतचा रस्ता सुरळीत सुरू करण्यात यावा, अशी मागणी वकिल नेत्रबिंदसिंग जदौन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे अर्ज केला आहे. सवाई माधोपूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे चौथ का बरवाडा फोर्ट, सिक्स सेन्स हॉटेलचे व्यवस्थापक, कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.