बॉलिवूडमधील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते. याच हरहुन्नरी अशा किशोर कुमार यांच्या गाण्यांवर काँग्रेस सरकारने बंदी घातली होती. १९७५ साली इंदिरा गांधी यांच्या सरकारने देशात आणीबाणी घोषीत केली होती. या आणीबाणी विरुद्ध देशातील अनेक नामवंत कलाकारांनी आवाज उठवला होता. सर्वसामान्य जनता काँग्रेसवर जोरदार टीका करत होती. हा खवळलेला जनसमुदाय शांत करण्यासाठी काँग्रेस सरकारला एखादा लोकप्रिय चेहरा हवा होता. या लोकप्रिय चेहऱ्याचा शोध किशोर कुमार यांच्यावर येऊन संपला. त्यावेळी काँग्रेस सरकारने सुपरस्टार किशोर कुमार यांच्या लोकप्रियतेचा वापर लोकांना शांत करण्यासाठी करावा, अशी योजना आखली होती.

१९७५ साली किशोर कुमार यांना सरकारच्या योजना रेडिओवरुन सांगाव्यात अशी विनंती केली गेली होती. तक्तालीन प्रसारण मंत्री वि.सी शुक्ला यांच्या मार्फत ही विनंती केली गेली होती. त्यावेळी किशोर कुमार यांना इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी काळातील २० सूत्री कार्यक्रमासाठी बनवल्या गेलेल्या गाण्यासाठी त्यांचा आवाज देण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी या विनंतीस साफ नकार दिला होता. कारण किशोर कुमार यांनी ही ऑफर देणाऱ्या व्यक्तीला विचारले की, हे गाणं मी का गावं? त्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने किशोर कुमार यांना सांगितलं की, सूचना आणि प्रसारण मंत्री वि.सी शुक्ला यांचा तसा आदेश आहे. आदेश ऐकल्यावर किशोर कुमार भडकले आणि त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ नकार दिला होता.

त्यानंतर किशोर कुमार यांच्या नकारामुळे नाराज झालेल्या वि.सी शुक्ला यांनी रेडियोवरील किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी आणली. आश्चर्याची बाब म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी किशोर कुमार यांच्या चित्रपटांवरही बंदी घातली. तसेच त्यांच्या गाण्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सची विक्रीही प्रतिबंधित करण्यात आली. आणीबाणी वेळी घडलेला प्रकार सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर चर्चेत आहे.