‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवरून कलगीतुरा

मिस्टर इंडिया चित्रपटाचे हक्क निर्माते बोनी कपूर यांनी झी स्टुडियोजला विकले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि रिमेक केलेल्या चित्रपटांच्या जोडीला येणारे वाद हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन गोष्ट नाही. ‘लक्ष्मीबॉम्ब’, ‘कबीर सिंग’, ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटांच्या रिमेकच्या वेळेस वाद उद्भवले आहे. आता ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या रिमेकवरूनही वाद उद्भवला आहे. ऐंशीच्या दशकातील अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. अनिल श्रीदेवीचा रोमान्स, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत, जावेद यांच्या लेखणीतून साकारलेली गाणी, उत्तम पटकथा आणि अमरीश पुरीच्या मोगॅम्बोने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली होती. गेल्या एक-दोन वर्षांपासून मिस्टर इंडिया या चित्रपटाचा रिमेक होणार याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू होती. मध्यंतरी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विटरवर टाकलेल्या अनिल कपूर सोबतच्या छायाचित्रामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला. या निमित्ताने शेखर-अनिल ही दिग्दर्शक अभिनेत्याची जोडगोळी पुन्हा एकदा दिसणार असल्याचा कयास प्रेक्षकांमध्ये बांधला जात होता.

आता चित्रपटाच्या रिमेकवरून नवीन वाद उद्भवला आहे. मिस्टर इंडिया चित्रपटाचे हक्क निर्माते बोनी कपूर यांनी झी स्टुडियोजला विकले होते. झी स्टुडियोज दिग्दर्शक अली अब्बास जफर बरोबर या चित्रपटाचा रिमेक करत आहे. या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात दिग्दर्शक अली अब्बास जफरने ‘झी स्टुडियोज सोबत मि. इंडियाच्या दुसऱ्या भागावर काम करण्यास उत्सुक असून सध्या कथेवर काम सुरू आहे. त्यामुळे कलाकाराचे नाव निश्चित झाले नाही,’ असे ट्वीट केले होते. त्यामुळे या वादाने नवीनच वळण घेतले. या चित्रपटाचा रिमेक करताना मला कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचे बोनी कपूर यांचे म्हणणे आहे. या कारणावरून झी स्टुडियो आणि बोनी कपूर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नसतानाच गीतकार जावेद अख्तर आणि दिग्दर्शक शेखर कपूरनेही या वादात उडी घेतली आहे. दिग्दर्शक शेखर कपूरने चित्रपटाच्या रिमेकबद्दल मला कल्पना दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मूळ कथेच्या प्रक्रियेत सक्रिय असूनही मला याचे श्रेय देण्यात येत नसल्याचा आरोप करत न्यायालयाची पायरी चढण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. या त्याच्या वक्तव्यावर संगीतकार जावेद अख्तर याची कथा, संवाद आणि गीते मी लिहिली असल्याने यावर तुमच्यापेक्षा माझा जास्त हक्क असल्याचे सांगत मिस्टर इंडियाच्या दिग्दर्शकावरच हल्ला चढवला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत सोनम आणि हर्षवर्धन कपूरने मूळ दिग्दर्शकाला न विचारता चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केल्याबद्दल अली अब्बासवर टीका केली आहे. याप्रकरणी झी स्टुडियोला विचारले असता, ‘मिस्टर इंडिया २’ हा मूळ चित्रपटाचा रिमेक अथवा सिक्वेल नसून काही दृश्यांची पुनर्निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगत सारवासारव केली आहे.

वरील प्रकरणात दिग्दर्शक शेखर कपूर आणि गीतकार जावेद अख्तर हे दोघे रिमेकपेक्षा चित्रपटाच्या हक्कांवरून भांडत आहेत. बोनी कपूर हे एकमात्र निर्माते असले तरीही झी स्टुडियोने रिमेकविषयी त्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे मत बॉलीवूडमधील जुनी-जाणती मंडळी व्यक्त करत आहेत. यात मूळ प्रश्न बाजूला पडला असून चित्रपटाशी संबंधित ज्येष्ठ मंडळी आपापल्या हितानुसार भांडत आहेत. या भांडणातून प्रेक्षकांच्या पदरात काय पडणार हे लवकरच कळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Controversy over the remake of the movie mr india zws