जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. भारतातील दिल्ली, हैदराबाद, पुणे येथे करोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या देशभरात भितीचं वातावरण पसरलं आहे. सरकारकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र  तरीदेखील करोनाविषयीची भीती नागरिकांमध्ये पसरल्याचं दिसून येत आहे. याचाच परिणाम सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावरही होणार असल्याचं दिसून येत आहे. हे संमेलन २७ मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.

‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, यंदा सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी जयंत पाटील यांनी आयोजकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये हे संमेलन यशस्वीरित्या करण्याची चर्चा करण्यात आली. त्यामुळे राजकीय स्तरावर या संमेलनाविषयी उतत्साहाचं वातावरण आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. सध्या देशावर करोनाचं संकंट असल्यामुळे हा धोका लक्षात घेत होणारं संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सांगलीचे निवास उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

वाचा : करोनामुळे शाळेला सुट्टी; विद्यार्थ्यांनी शक्कल लढवतं होमवर्क अॅप केलं ठप्प

“करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आता पुण्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सातारा आणि जवळपासच्या भागातील यात्रा ,जत्रा सारं काही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा लेखी सूचनाही आहेत. विशेष म्हणजे या लेखी सूचनेत, गर्दीचे कार्यक्रम करायचे असल्यास ते स्वत:च्या जबाबदारीवर करा. यात प्रशासन जबाबदार राहणार नाही असं स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आलं आहे. परंतु सांगलीमध्ये असं पत्र काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे सांगलीत संमेलन करायचं की नाही यावर २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी निर्णय देणार आहेत”, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.