नीलेश अडसूळ

करोनाकाळातील अंधकार काहीसा दूर होऊन नाट्यसृष्टीला प्रकाशवाट दिसू लागली आहे. अद्याप नाटकांची मांदियाळी झाली नसली तरी काही नाटकांचे प्रयोग हळूहळू जाहीर होऊ लागले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर या आनंदवार्ता कानी येत असल्याने रंगभूमीवरही दिवाळीचे चैतन्य आले आहे. अर्थात हे प्रयोग करताना अनेक आव्हाने येत आहेत. पण यातूनही मार्ग काढत पुन्हा प्रज्वलित झालेला हा नाट्यदीप प्रखर तेजाने, ऊर्जेने आणि आनंदाने उजळो हेच नटराजाला आर्जव…

करोनाने भारतात पाय पसरले आणि मार्च २०२० अखेर सर्वच क्षेत्रांना टाळे लागले. पर्यायाने नाटकही ठप्प झाले. आर्थिक आवाका मूठभर असलेल्या या क्षेत्रातील रंगकर्मींची पोटापाण्याची समस्या अगदी बिकट होती. शासनापुढे अडचणींचा डोंगर आसल्याने त्यांनीही मदतीचा हात दिला नाही. मिळेल ते काम करत, कर्जबाजारी होऊन रंगकर्मींनी कसेबसे दिवस ढकलले. मग जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीने नोव्हेंबर २०२० मध्ये रंगभूमीचे दार उघडले. पण आर्थिक अवनती इतकी झाली होती की जोखीम घेऊन प्रत्यक्षात नाटक नाट्यगृहात पोहोचायला दीड महिन्यांचा काळ गेला. जानेवारी २०२१ मध्ये नाट्यक्षेत्र उभारी घेऊ लागले, पण त्याला गती मिळण्याच्या आतच एप्रिलदरम्यान नाट्यगृहांना टाळे लागले. करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा घाला घातला.

 पुन्हा सात महिन्यांचा जीवघेणा ब्लॅकआऊट रंगकर्मींच्या नशिबी आला. नाटक कधी सुरू होईल याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती. करोनाकहर आटोक्यात आल्याने सप्टेंबरअखेर नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि कंबर कसून सगळे तयारीला लागले. ही तयारी पूर्वीसारखी नव्हती. म्हणजे यात आनंद होता, उत्साह होता, उत्सुकताही होती पण भीती आणि चिंताही आहे. याआधी सुरू झालेले नाटक बंद पडल्याने लाखोंचा तोटा निर्मात्यांनी सहन केला होता. त्यामुळे ‘दुधाने तोंड पोळलं, की ताकही फुंकून प्यावं लागतं’ अशी वेळ निर्मात्यांवर आली. तरीही रंगभूमीच्या प्रेमापोटी आणि प्रेक्षकांवर असलेल्या विश्वासामुळे जोखीम घेऊन नाटक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि २३ ऑक्टोबर २०२१ रोजी नाटक पुन्हा सुरू झाले.

यंदाही अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी पहिले पाऊल टाकले आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘तू म्हणशील तसं’ या दोन नाटकांची नांदी त्यांनी केली. आता नाट्यसृष्टीतील वातावरण पुन्हा सकारात्मक होऊ लागले आहे. वर्तमानपत्रातील जाहिराती, समाजमाध्यमांवरील घोषणा परतू लागल्या आहेत. ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘सही रे सही’, ‘मराठी बाणा’, ‘इशारो इशारो में’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘तिला काही सांगायचंय’ आणि यासह अनेक नाटकांचे प्रयोग लागले असून नव्या दर्जेदार कलाकृतीही टप्प्याटप्प्याने प्रेक्षकभेटीला येणार आहेत. त्यामुळे ही दिवाळी नाट्यक्षेत्रासाठीही तेजाची ठरणार आहे.

‘आता सात ते आठ नाटकांनी पुढे येण्याचे धाडस केले असले तरी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा राखून फार वेळ नाटक करता येणार नाही. त्यातही शनिवार-रविवारच प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर १०० टक्के उपस्थितीला परवानगी मिळायला हवी. अनेक निर्माते नवी नाटकं घेऊन तयार आहेत, पण ५० टक्क्यांच्या निर्बंधामुळे सगळेच थांबलेत. कारण नुसते नाटक येऊन चालणार नाही तर ते टिकायलाही हवे. शासनाने १०० टक्के उपस्थितीस परवानगी देण्याचा सकारात्मक विचार करावा एवढीच आमची मागणी आहे,’ असे अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांनी सांगितले.

निर्माते राहुल भंडारे सांगतात, तिसरी लाट जरूर यावी, पण ती नाटकांची यावी. रंगकर्मी, प्रेक्षक सर्वच त्या  नाट्य-लाटेच्या प्रतीक्षेत आहेत. मराठी रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबर रोजी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक प्रेक्षकभेटीला येईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘इब्लीस’ येईल तर डिसेंबरअखेर दोन नव्या नाट्यकृती येतील. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेले ‘चार्ली’, तर मिलिंद पेडणेकर लिखित-दिग्दर्शित ‘वन्स मोअर तात्या’ अशी नव्या नाटकांची नावे आहेत. परिस्थिती लवकरच सकारात्मक होऊन नाट्यसृष्टी पूर्ववत होईल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

 ‘५० टक्के उपस्थितीची मर्यादा दूर होऊन आता पूर्ण क्षमतेने नाटक सुरू व्हायला हवे, ही माझी महत्त्वाची मागणी आहे. या आधीही आम्ही ‘वाडा चिरेबंदी’चे प्रयोग सुरू केले, पण दुसऱ्या लाटेमुळे ते पुढे होऊ शकले नाहीत. आता पुन्हा नोव्हेंबरमध्ये हे नाटक प्रेक्षकभेटीला येत आहे. कोंडलेल्या मन:स्थितीतून बाहेर पडताना प्रेक्षकांनी नाटकाला प्राधान्य द्यायला हवे. आम्ही जसे प्रेक्षकांची वाट पाहतोय तसेच तेही आमची वाट पाहात आहेत. हा दुहेरी संवाद आहे, जो लवकरात लवकर सुरू व्हायला हवा,’ असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि सूत्रधार गोट्या सावंत यांनीही ५० टक्के उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नाटक पूर्ववत करायचे असेल तर १०० टक्केउपस्थिती हाच पर्याय आहे, असे ते सांगतात. ‘सध्या सुरू झालेल्या नाटकांवरून प्रेक्षक सकारात्मक असल्याचे दिसते. डिसेंबरमध्ये विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, नम्रता संभेराव यांचे ‘कुर्ररर’ हे नवे नाटक येत आहे. यासोबत गिरीश ओक आणि आदिती सारंगधर यांचे ‘प्लॅटोनिक लव्ह’ हे नाटकदेखील प्रेक्षकभेटीला येणार आहे. प्रेक्षक उपस्थितीत वाढ झाली तर नाटकं जोरदार येतील,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  येत्या ७ नोव्हेंबरला ‘व्हॅक्युम क्लीनर’, २१ नोव्हेंबरला ‘वाडा चिरेबंदी’, ५ डिसेंबरला ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाट्यकृती आम्ही घेऊन येत आहोत. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित एक नवे नाटक लवकरच जाहीर करणार आहोत,’ अशी माहिती निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी दिली.

सुरू असलेल्या पण करोनामुळे बंद पडलेल्या काही नाट्यकृती सुरू करण्यासाठी दिग्दर्शक- निर्माते प्रयत्न करत आहेत. तर नव्या नाट्यकृतींसाठीही लेखक, दिग्दर्शक यांची तयारी सुरू आहे. दिवाळीनंतर १०० टक्के उपस्थितीला परवानगी मिळेल, अशी आशा रंगकर्मींना आहे. तसे झाले तर जानेवारी २०२२ मध्ये नव्या वर्षासोबत नवी झळाळी नाट्यसृष्टीला मिळेल.