‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. सलमान खान होस्ट असलेल्या या शोचे सध्या १३वे पर्व सुरु आहे. मात्र बिग बॉस ऐन रंगात आलेला असतानाच निर्मात्यांनी या शोला अर्ध्यावरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सर्व बिग बॉस स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.

का केला बिग बॉस अर्ध्यावरच बंद?

देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत चित्रपट, मालिका, आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्पलॉइज’, ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’, ‘इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हजन डिरेक्टर्स असोसिएशन’ या संघटनांनी एकमताने घेतला आहे. त्यामुळे बिग बॉसचे चित्रीकरण त्वरित थांबवण्यात आले. चित्रीकरण थांबवल्यामुळे सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.

बिग बॉस अर्ध्यावरच थांबवल्यामुळे चाहते थोडे नाराज आहेत. मात्र या चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी बिग बॉसचे जूने भाग पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. यासाठी कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो देखील पोस्ट करण्यात आला आहे.