अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली होती. आता रणधीर यांना ICU मध्ये हलवण्यात आले आहे.

रणधीर कपूर यांनी स्वत: ई-टाइम्सची संवाद साधला. ‘माझ्या काही चाचण्या करायच्या असल्यामुळे मला ICU वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णालयात सर्वजण माझी काळजी घेत आहेत. डॉक्टर नेहमी माझ्या बाजूला असतात’ असे रणधीर म्हणाले.

आणखी वाचा : सलमानच्या ‘राधे’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री

पुढे रणधीर कपूर म्हणाले, ‘मला करोना कसा झाला याची कल्पनाच नाही. खरतर चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या घरात काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना देखील उपचारासाठी माझ्यासोबत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’

काही दिवसांपूर्वी रणधीर कपूर यांनी लशीचे दोन डोस घेतले होते. त्यानंतर ताप येऊ लागल्यामुळे त्यांनी करोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. सध्या रणधीर यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे.