कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध उठवल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहेत. हे चित्र पाहून मुंबई पोलिसांपासून ते अगदी मुंबई महापालिकापर्यंत सारेच जण करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत. करोनाच्या मागील दोन लाटांमध्ये सर्वच क्षेत्राप्रमाणे बॉलिवूड क्षेत्राला बराच फटका बसला होता. त्यामुळे करोना लाटेचा परिणाम बॉलिवूडकरांनीही अगदी जवळून पाहिलाय. म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्माने पुढे येत नागरिकांना एक आवाहन केलंय.

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत हे आवाहन केलंय. “मुंबईत एका दिवसांत एकूण ९२० जणांना विना मास्क पकडलं आहे. कमीत कमी इतरांसाठी का होईना मास्क चेहऱ्यावर लावा” असं लिहित तिने ही पोस्ट शेअर केली आहे. भविष्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता अनुष्काने या पोस्टच्या माध्यमातून लोकांना चेहऱ्यावर मास्क लावण्याचं आवाहन केलंय. मुंबई पोलिसांनी नुकतंच विना मास्क फिरताना पडकलेल्या लोकांची संख्या दाखवणारा एक आलेख शेअर केलाय. हा आलेख जोडत अनुष्का शर्माने ही पोस्ट शेअर केली आहे. या आलेखात २३ ऑगस्ट रोजी ४८१ वर असलेली ही संख्या २९ ऑगस्ट रोजी ९२० वर जाऊन पोहोचली आहे. त्यामूळे लोकांना सतर्क करण्यासाठी अनुष्का शर्माने पुढे येत हे आवाहन केलंय.

anushka-sharma-instagram
(Photo: Instagram/anushkasharma)

अनुष्का शर्मा हिच्यासोबत अनिल कपूर, कियारा आडवाणी आणि करिश्मा कपूर या सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. दोन हजारांच्या पलिकडे गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी आज 1511 वर आला आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 3106 सक्रिय रुग्ण आहेत. खबरदारी म्हणून मुंबईतील 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये आहे. पती विराट कोहलीसोबत ती इंग्लंड टूरवर गेली आहे. यूकेमध्ये गेल्यानंतर अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासोबत रमलीय. गेल्या जूनमध्येच अनुष्का शर्मा इतर क्रिकेटर्स आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्ससोबत यूकेमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर अनुष्का शर्मा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत प्रत्येक अपडेट शेअर करत असते.