गीताला पहिल्यांदा पोस्टरवर पाहिलं, हरभजन सांगतोय ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

‘तिच्याबद्दल माहिती काढ असं मी युवराजला सांगितलं होतं’

ऑक्टोबर २०१५ मध्ये या दोघांनी लग्न केलं.

किक्रेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा हे २०१५ मध्ये विवाहबंधनात अडकले. या जोडप्याला एक मुलगीदेखील आहे. नुकताच हरभजन नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या रेडिओ चॅट शोदरम्यान नेहाची गाडी हरभजन गीताच्या प्रेमकहाणीवर येऊन थांबली. अर्थात खासगी आयुष्याबद्दल फारसं उघड न करणाऱ्या हरभजननं या कार्यक्रमात आपल्या प्यारवाली लव्हस्टोरीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

या प्रेमकहाणीची सुरूवात एका पोस्टरपासून झाली असल्याचं हरभजननं नेहाच्या कार्यक्रमात कबुल केलं. ‘मी गीताला पहिल्यांदा एका पोस्टरवर पाहिलं. पाहताचक्षणी मला ती खूपच आवडली, मी तिच्या प्रेमात पडलो. माझ्यासोबत तेव्हा युवराज सिंग होता, मी त्याला गीताबद्दल विचारलं पण मलाच काय त्यालादेखील ती कोण होती हे माहिती नव्हतं. तिच्याबद्दल माहिती काढून मला सांग असं मी त्याला सांगितलं. आमचा एक मित्र तिला ओळखत होता. त्याच्याकडून मला तिचा नंबर मिळाला.’ असं हरभजन सिंग म्हणाला.

मात्र गीताला लग्नासाठी मनवणं सोप्प नव्हतं तिनं मला आठ नऊ महिने वाट पाहायला लावली होती असंही हरभजन म्हणाला. तिला भेटण्यासाठी मी मेसेज करायचो पण तिनं मला कधीच उत्तर दिलं नाही. एकदिवस तिनंच मला मेसेज केला. तिच्या चालकाला आयपीएलच्या तिकिट्स हव्या होत्या. मी तिला दिल्या. या बदल्यात तिनं भेटण्याचं मान्य केलं.

मी तिला लग्नाची मागणी घातली मात्र तिला करिअर करायचं असल्यानं तिनं मला नकार दिला. मी तिच्या उत्तराची आठ महिने वाट पाहत होतो असं म्हणत हरभजननं या कार्यक्रमात आपली प्रेमकहाणी सांगितली. ऑक्टोबर २०१५ मध्ये या दोघांनी लग्न केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cricketer harbhajan shingh reveals his love story with geeta basra