Asha Bhosle Funeral Live Updates: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांची उपस्थिती आहे. क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने आज विशेष उपस्थिती दर्शवत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या दुःखाच्या वेळी आजीच्या जाण्याने कोलमडलेल्या जनाई भोसलेची भेट घेत मोहम्मद सिराजने तिला आधार दिला. सिराजचे जनाईला शांत करण्याचे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. मोहम्मद सिराजव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, हेलन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार तिथे पोहोचले आहेत. आज सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी सचिन तेंडुलकर, रणवीर सिंह, तब्बू, रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ, हेलन यांच्यासह अनेकजण आले होते. आशा भोसलेंची नात जनाई भोसले ही आजीच्या निधनाने कोलमडली आहे. तिला धीर देण्यासाठी तिचा मानलेला भाऊ क्रिकेटपटू मोहम्मद सिराज पोहोचला.
मोहम्मद सिराजने आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले आणि रडणाऱ्या जनाईला शांत केलं. तिला धीर दिला. मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जनाई ही मोहम्मद सिराजची मानलेली बहीण असून ती त्याला राखी बांधते.
पाहा मोहम्मद सिराज व जनाईचा भावुक व्हिडीओ-
मोहम्मद सिराजनंतर रणवीर सिंहदेखील आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी आला. त्याने आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर जनाईला या कठीण प्रसंगात धीर दिला.
जनाई आजी आशा भोसलेंच्या खूप जवळ होती. आजीच्या निधनाने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडच्या काळात आशा भोसले कोणत्याही कार्यक्रमाला जायच्या, तेव्हा जनाई सावलीसारखी त्यांच्याबरोबर असायची. आता आजीचं निधन झाल्याने जनाईने तिचा सर्वात मोठा आधार गमावला आहे. आशा भोसलेंच्या निधनानंतर जनाईची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.
११ एप्रिलला आशा भोसलेंची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांचं १२ एप्रिल रोजी, रविवारी निधन झालं. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्री व संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांच्या घराबाहेर व शिवाजी पार्कमध्ये चाहत्यांनी आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
