अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे.

मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला.

रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले. आर्थिक गैरव्यवहार, हत्या, आत्महत्या, अमली पदार्थविषयक तपास करण्यास सीबीआय सक्षम आहे. मात्र हे पहिलेच प्रकरण असावे ज्यात सीबीआयला एनसीबीचे सहकार्य आवश्यक वाटले, असे सांगत अ‍ॅड. मानेशिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या आरोपाबाबत ईडीने रिया, तिचे वडील इंद्रजीत, भाऊ शोविक, व्यवस्थापक श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार तपासादरम्यान रियाने भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले(डीलीट केलेले) व्हॉट्सअ‍ॅप संदेश पुन्हा प्राप्त केले. यात  अमली पदार्थाबाबतही संवाद आहेत. या संदेशांबाबत ईडीने सीबीआयसह एनसीबीलाही माहिती दिली. सीबीआयच्या तपासात सुशांतचा आचारी नीरज सिंह यानेही अमली पदार्थाशी संबंधित माहिती जबाबात दिली.

सिद्धार्थ पिठानीची सलग सहाव्या दिवशी चौकशी

सीबीआयच्या विशेष पथकाने सिद्धार्थ पिठानी याची सलग सहाव्या दिवशी चौकशी के ली. बुधवारी सिद्धार्थ, आचारी नीरज, नोकर दीपेश सावंत यांची पथकाने दिवसभर चौकशी केली.

तर सुशांत वास्तव्यास होता त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकालाही पथकाने दुपारी चौकशीसाठी बोलावले होते. ८ जूनला रियाने सुशांतचे घर सोडले. त्याच दिवशी सुशांतच्या घरातील आठ हार्डड्राईव्हची विल्हेवाट लावण्यात आली, अशी कबुली सिद्धार्थ, दीपेश यांनी दिली.

दीपेश माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला याबाबत सीबीआय प्रवक्ते आर. के . गौर यांच्याशी संपर्क साधला असता या घडामोडींबाबत माहिती मिळालेली नाही. खातरजमा करून माध्यमांना कळवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.