‘दंगल’मध्ये आपल्या धाकड अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी फातिमा सना शेख आता लोकांच्या निशाण्यावर आहे. फातिमाने रमजानदरम्यान स्विमसूट घातल्याने तिच्यावर सोशल मीडियावर खूप टिका केली जात आहे. जीक्यू मासिकासाठी तिने नुकतेच फोटोशूट केले आणि यातले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. जून महिन्याच्या मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले होते. मालदिवच्या निळ्याशार समुद्रामध्ये काळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये फातिमा अत्यंत सुंदर दिसत आहे मात्र काही लोकांना तिचा हा अंदाज पसंत पडलेला नाही असे दिसते.

फातिमाने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या आहेत. रमजानसारख्या पवित्र महिन्यात स्विमसूट घालणे चुकीचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. फातिमा एक मुस्लिम आहे आणि रमजानमध्ये तिला असे करणे शोभा देत नाही अशीही कमेंट काहींनी दिल्या. तर ती मुस्लिम असल्याचे विसरली आहे का? अशी सडकून टीकादेखील फातिमावर करण्यात आली. फातिमाने जरी आतापर्यंत या सर्व कमेंट्सवर उत्तर दिले नसले तरी तिचे अनेक चाहते समर्थनसाठी पुढे आले आहेत. ‘तू सुंदर आहेस आणि लोकांनी काहीही म्हटलं तरी तू देशातील आणि देशाबाहेरील प्रत्येक मुलीसाठी आदर्श असशील,’ असा संदेश ‘दंगल गर्ल’च्या चाहत्यांनी तिच्यासाठी दिला आहे.

 

वाचा : ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ला मनमोहन सिंग, सोनिया गांधींच्या परवानगीची गरज

बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या पोशाखावरून, कपड्यांवरून टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हासुद्धा तिच्या कपड्यांवरून टीका झाली होती. मात्र प्रियांकाने या टीकांवर सडकून प्रतिक्रिया देऊन टीकाकारांचे तोंड बंद केले. दिशा पटानी, कंगना रणौत, सोनम कपूर, निया शर्मा आणि मोनाली ठाकूर यांच्यावरही याआधी टीका झाली होती आणि त्यांनीसुद्धा टीकाकारांना योग्य प्रत्युत्तर दिले होते. फातिमासुद्धा लवकरच सर्व टीकाकारांना योग्य प्रत्युत्तर देईल अशीच आशा आहे