दीपाली पोटे- आगवणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तम खेळाडूंना प्रसिद्धी सोबत कधी-कधी चाहत्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. तसंच काहीसं विनेश फोगटच्या बाबतीत झालं. २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगटला २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत खेळात दुखापत झाली आणि स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विनेशला पदकापर्यंतची मजल मारता आली नाही. त्यामुळे तिची आणि चाहत्यांची दोघांची निराशा झाली. तिनं तर अगदी कुस्ती सोडण्याचा विचार केला होता. परंतु खेळाडू हा कधीच पळपुटा नसतो तो नेहमीच मैदानामध्ये चांगली कामगिरी करत खेळातून स्वतः सिद्ध करत असतो. विनेशनंही हेच पुन्हा सिद्ध केलं आणि २०२२मध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं. तिनं सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

विनेशचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ साली हरियाणा तील बलाली इथं झाला. नामवंत कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगट यांची ती चुलत बहीण आहे. लहानपणापासूनच कुस्तीच्या आखाड्याची ओळख असलेल्या विनेशला कुस्तीचं प्रशिक्षण तिचे काका आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांनीच दिलं. तिने ४८,५०,५३ किलो फ्रीस्टाइल प्रकारात भाग घेत, प्रो रेसलिंग लीगमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. विनेशनं खेळातील डावपेच शिकत आपलं शालेय शिक्षण हरियाणातील केसीएम वरिष्ठ माध्यमिक विद्यालयामधून घेतलं तर उर्वरित शिक्षण रोहतकमधील एमडीयू विद्यापीठातून पूर्ण केलं.

“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

विनेशनं २०१३ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ५२ किग्रॅ. गटात उत्कृष्ट कामगिरी करून पहिल्यांदा कांस्य पदक प्राप्त करत आपल्या यशस्वी वाटचालीला सुरुवात केली. २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात तिने ग्लासगो येथे उत्कृष्ट खेळ करत आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवलं. दररोज अधिकाधिक सुधारणा करत तिने लोकांच्या अपेक्षा उंचावत नेल्या आणि उत्तम खेळ दाखवत त्या पूर्णही केल्या.

कुस्तीपटू विनेश फोगटची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक!

२०१८ साली विनेशने हरियाणाच्या खरखोडा येथील रहिवासी सुप्रसिद्ध कुस्तीपटू सोमवीर राठी याच्यासोबत आगळ्या पद्धतीनं लग्न केलं. त्यांनी लग्नात सातऐवजी आठ फेरे घेऊन एक वेगळा विक्रम चकेला. आठव्या फेरीत त्यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असे वचन घेऊन एक नवीन पायंडा पाडला.

विनेश फोगट हिच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारनं तिला २०१६ मध्ये अर्जुन पुरस्कार तर २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. २०२० मध्ये भारतामधील सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणजेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारही तिला बहाल करण्यात आला.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 vinesh phogat wins gold in freestyle wrestling know all about her nrp
First published on: 20-08-2022 at 06:40 IST