सध्या चित्रपटसृष्टीत कौशल्यापूर्ण निर्मितीतून अमुलाग्र बदल घडविण्याची ओळख ‘गँग ऑफ वासेपुर’कार दिग्दर्शक अनुराग कश्यपची आहे. पण, त्याच्याहीपेक्षा माझे वडिल महेश भट्ट यांचे चित्रपट अधिक पटीने उजवे असल्याचे मत पूजा भट्ट यांनी व्यक्त केले.
सध्या बॉलीवूडमध्ये मोजकेच चित्रपट नवे दिसतात आणि इतर जून्याच बाटलीत नवी दारू भरल्याप्रमाणे उथळ भासतात, असेही पूजा भट्ट यांनी सध्या बॉलीवूडमधील नव्या दमाच्या चित्रपटांबद्दल बोलत असताना एका मुलाखतीत म्हटले.
पूजा भट्ट पुढे म्हणाल्या की, “वडिलांचे चित्रपट बघूनच लहानाचे मोठे झाले. शेखर कपूर आणि माझ्या वडिलांनी एकेकाळी निर्माण केलेले चित्रपट सध्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये अग्रगण्य असलेल्या अनुराग कश्यप याच्या चित्रपटांपेक्षा नक्कीच कितीतरी पटीने उजवे आहेत असे मला वाटते.” चित्रपटांच्या कौशल्यावर भाष्य करण्यात मी काही तरबेज नाही पण, सध्या नाविण्यपूर्ण असे काही दिसून येत नाही. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा फक्त चांगले पॅकेजींक करून मांडण्यात येते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
पूजा भट्ट यांचे वडिल महेश भट्ट यांचा ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘नाम’, ‘काश’, ‘डॅडी’ असे बोलके चित्रपट करण्यात हातखंडा राहिला आहे. तर, कन्या पूजा भट्ट यांचा प्रवास अभिनेत्री ते दिग्दर्शक आणि पुढे सहनिर्माती असा राहिला आहे. पूजा भट्ट यांनी १९८९ मध्ये डॅडी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर ‘दिल है की मानता नही’, ‘सडक’, ‘सर’, ‘जखम’ आणि ‘तमन्ना’ असे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर कॅमेरामागची भूमिका सांभाळत पूजा भट्ट यांनी ‘पाप’, ‘धोका’, ‘कजरा रे’ आणि ‘जिस्म-२’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.