‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा वाद अखेर संपुष्टात

“जोतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही”, महेश कोठारेंचं गावकऱ्यांना आश्वासन

स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी, भाविकांनी आक्षेप नोंदवला होता. मालिका ही पौराणिक व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी अशी गावकऱ्यांची मागणी सुरुवातीपासूनच सुरू होती. यासाठी गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्याकडे धाव घेत याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी (१८ नोव्हेंबर) राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या चर्चेअंती महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजून घेत, त्यांना ग्वाही दिली की, “जोतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे काही वाहिनीवर दाखवले जाईल त्याच्यात कोणतेही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल.”

यावेळी स्टार प्रवाह मराठी वाहिनी, महेश कोठारे आणि गावकरी यांच्यात मध्यस्थीची यशस्वी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी पार पाडल्याने गावकऱ्यांनी समजुतीपणा दाखवत मालिकेच्या चित्रीकरणाला कोणताही विरोध गावाकडून केला जाणार नाही आणि शूटिंग व्यवस्थित पार पडेल असा शब्द महेश कोठारे यांना दिला.

यावेळी गावकरी, महेश कोठारे आणि स्टार मराठी वाहिनीचे सतीश राजवाडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे आभार मानले. यावेळी गावचे ग्रामस्थ अजित धरणे, जयवंत शिंगे, नेताजी दादर्णे, जगनाथ दादर्णे, आनंदा लादे, सुनिल नवाळे, गोरख बुणे,नवनाथ लादे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, मनसे पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुका सचिव लखन लादे आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dakkhancha raja jotiba marathi serial dispute sort out by mns ssv