scorecardresearch

‘एक नंबर’ नृत्य

भारतीय सिनेसृष्टीने भल्याभल्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

भारतीय सिनेसृष्टीने भल्याभल्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. प्रादेशिक चित्रपटसृष्टीत विशेषत: मराठीत अनेक परदेशी कलावंतांची पावलं वळू लागली आहेत. हिंदूी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अर्मेनियन डान्सर एलेनाची पावलंही मराठीच्या दिशेनं वळली आहेत. पदार्पणातच तिने ‘एक नंबर’ धमाल गाण्यावर नृत्य केलं आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक नंबर..सुपर’ या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश परबसोबत एलेनाचे धमाल नृत्य पाहायला मिळणार आहे.

‘एक नंबर..सुपर’ असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी केली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार असून एलेनासोबत नाचतानाही दिसणार आहे. ‘एक नंबर..सुपर’ या चित्रपटातील माझे तुकडे तुकडे व्हतील गं..

असा मुखडा असलेल्या गाण्यावर एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून राहुल संजीर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.  या चित्रपटाच्या निमित्तानं एलेनानं प्रथमच मराठी चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एलेनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. एलेना-प्रथमेशवर चित्रित करण्यात आलेलं गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून, वरुण लिखते, मुग्धा कऱ्हाडे आणि कविता राम यांनी गायलं आहे. वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. एलेना ही रशियातील प्रसिद्ध नृत्यांगना आहे. परदेशाबरोबरच भारतातही तिचे खूप चाहते आहेत. जबरदस्त लूक, आकर्षक नृत्य, लक्षवेधी देहबोली, गोड स्मित, व्यक्तिमत्त्व आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी एलेना यूटय़ूबवर खूप लोकप्रिय आहे. एक नंबर..सुपर चित्रपटातील गाण्यात प्रथमेशसोबत तिच्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘एक नंबर..सुपर’ मधील बाबूराव झाला.. हे गाणं यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून आता माझे तुकडे तुकडे व्हतील गं..हे गाणं धमाल करण्यासाठी सज्ज झालं आहे. या गाण्यासाठी एलेनाची निवड करण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायला आवडतं. ‘माझे तुकडे तुकडे व्हतील गं..’ या गाण्यासाठी एलेनाची निवडही याच विचारातून करण्यात आली आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका प्रसिध्द नृत्यांगनेचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आहे. वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून त्यावर बांधलेली चाल त्याहीपेक्षा सुरेख असून आबालवृद्धांना थिरकायला लावणारी आहे. नेहमीप्रमाणे  एक नंबर..सुपरच्या माध्यमातून प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dance by indian cinema foreign artist in marathi industry work together ysh

ताज्या बातम्या