‘हॅरी पॉटर’ या चित्रपटात हॅग्रिड हे पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कॉलट्रेन यांचं निधन झालं. ‘हॅरी पॉटर’मधील त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांचा तो अंदाज आणि विनोदी शैली लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. परंतु त्यांच्या निधानाच्या बातमीने प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणले. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ आणि एमा वॉटसन यांनीही रॉबी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यासाठी एक भावनिक संदेश लिहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “मी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण…”, अपयशी चित्रपटांच्या दिग्दर्शकांबाबत सिद्धार्थ मल्होत्राचे मोठे विधान

हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने इन्स्टाग्रामवर रॉबी कोलट्रेनबरोबरचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने एक भावनिक कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, “मी भेटलेल्या सर्वात मजेदार व्यक्तींपैकी रॉबी एक होते आणि ते सेटवर आम्हा लहान मुलांना सतत हसवायचे.”

पुढे तो म्हणाला, “मला आमच्या ‘हॅरी पॉटर अँड प्रिझनर ऑफ अझकाबान’ या चित्रपटाच्या आठवणी लक्षात आहेत. तेव्हा तुफान पाऊस पडत होता आणि आम्ही हॅग्रीडच्या झोपडीत लपलो होतो. आमचे मनोबल वाढवण्यासाठी ते किस्से आणि विनोद सांगत होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो आणि त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ते एक अतिशय प्रेमळ आणि हरहुन्नरी अभिनेते होते.”

तर हर्माईनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री एमा वॉटसननेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रॉबीचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘रिटर्न टू हॉगवर्ट्स’ रियुनियन स्पेशलच्या दिवशी काढलेला त्यांचा एक फोटो तिने पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “तुमच्या आत्म्याला शांती मिळो. रॉबी हे माझे सर्वात मजेशीर काका होते. मी लहान असताना आणि आता मोठी झाल्यावरही ते माझी खूप काळजी घ्यायचे. ते खूप प्रेमळ होते. त्यांच्यात एक लहान मूल दडलेले होते. मला तुमची खूप आठवण येईल.”

पुढे तिने लिहिले, “‘हॅरी पॉटर’च्या सेटवर तुम्ही माझ्याशी जितक्या प्रेमाने वागलात, माझी काळजी घेतलीत, तुमच्या आठवणीत मीही तितक्याच प्रेमाने प्रत्येकाशी वागेन. तुम्ही आम्हाला तुमचे कुटुंब बनवलंत. हॅग्रिड ही भूमिका दुसरं कोणीही तुमच्याईतकी चांगली साकारू शकलं नसतं. त्याच्यामुळेच मला हर्माईनी ग्रेंजर या पात्राचा आनंद घेता आला.”

हेही वाचा : हॅरीच्या आठवणी!

हॅरी पॉटरमधील त्यांचं पात्र लोकप्रिय झालं असलं तरी त्यांनी इतरही बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. जेम्स बॉन्डच्या २ बॉन्डपटात ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daniel radcliffe and emma watson got emotional over robbie coltrane death rnv
First published on: 15-10-2022 at 11:34 IST