मराठी चित्रपटांमध्ये सिक्वलपट ही संकल्पना आता कुठे रुळू पाहते आहे. त्यामुळे काही गाजलेल्या मराठी चित्रपटांचे नवे भाग नव्या स्वरूपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. महेश वामन मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ हा अशा लोकप्रिय मराठी सिक्वलपटांपैकी एक महत्त्वाचा चित्रपट आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सिक्वेल ‘दे धक्का २’ आता प्रदर्शित झाला आहे. १४ वर्षांनी त्याच व्यक्तिरेखा त्यांच्या सगळय़ा गुणवैशिष्टय़ासह साकारणं हा गमतीशीर अनुभव होता, असं सांगत ‘दे धक्का २’च्या कलाकारांनी या चित्रपटाच्या लंडनवारीतील गमतीजमती ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत उलगडल्या.

एक विस्थापित झालेलं कुटुंब, त्यांच्यात झालेले मतभेद आणि ते मतभेद मिटून त्यांचं पुन्हा एकत्र येणं हे सगळं एका प्रवासादरम्यान घडतं, अशी पहिल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाची सर्वसाधारण कथा होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकपसंती मिळाली. चौदा वर्षांपूर्वी जेव्हा कॉर्पोरेट निर्माते नुकतेच मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायला लागले होते तेव्हा या चित्रपटाने १४ कोटींची कमाई करत पहिला धक्का दिला होता, अशी माहिती या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता मकंरद अनासपुरे यांनी दिली. आता त्याच व्यक्तिरेखा आणि तेच कलाकार घेऊन म्हणजे मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिध्दार्थ जाधव आणि सक्षम कुलकर्णी १४ वर्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ‘पांघरूण’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री गौरी इंगवलेने पहिल्यांदाच या चित्रपटात भूमिका केली आहे. ‘दे धक्का’ करत असतानाच आमचं एक कुटुंब तयार झालं होतं, आता या चित्रपटाच्या निमित्ताने हे कुटुंब अधिक घट्ट झालं आहे. आणि आता कितीही प्रयत्न केले तरी ते तुटणार नाही, अशी भावना अभिनेता शिवाजी साटम यांनी व्यक्त केली.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘दे धक्का’च्या वेळी महेश मांजरेकर स्वत:च निर्माते झाले..
‘दे धक्का’ करायचं ठरवलं होतं तेव्हा महेश मांजरेकर यांनी माझ्या तारखा घेतल्या होत्या. चित्रपटाची सगळी तयारी झाली होती. आणि अचानक चित्रपटाच्या निर्मात्याने माघार घेतली. आता पुढे काय? चित्रपट करायचा हे तर ठरलं होतं. तेव्हा महेश मांजरेकर स्वत:च निर्माते म्हणून उभे राहिले. त्यांनी पैशाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केलं होतं. आता इतक्या वर्षांनी दुसरा भाग करताना चित्रपटातील मूळ व्यक्तिरेखांची परिस्थिती बदलली आहे. तेव्हा ते गरीब होते, आता ते श्रीमंत झाले आहेत, लंडनमध्ये आले आहेत. मात्र त्यांचे मूळ स्वभाव अजिबात बदललेले नाहीत. त्या त्या व्यक्तिरेखा त्यांच्या वैशिष्टय़ांसह मांजरेकर यांनी पुन्हा पडद्यावर आणल्या आहेत, असे अनासपुरे यांनी सांगितले.

करोनाकाळात विनोदी कार्यक्रम खूप बघितले गेले
‘दे धक्का २’चं चित्रीकरण आधीच पूर्ण झालं होतं. करोनाकाळात चित्रपटाची इतर कामं रखडली होती. गेल्या दोन वर्षांत लोकांना मुळातच असा काही मोठा रोग येईल आणि अशा पध्दतीने सगळंच जग थांबेल, असा धक्का कधीच बसला नव्हता. त्यामुळे कंटाळलेल्या, निराश झालेल्या प्रेक्षकांना या काळात खूप मोठा आधार विनोदाच्या औषधाने दिला आहे. या काळात विनोदी कार्यक्रम खूप बघितले गेले. आणि म्हणूनच ‘दे धक्का २’ हा चित्रपटही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा असला पाहिजे, यावर भर होता. तशाच पध्दतीने तो केला गेला आहे, असे अनासपुरे यांनी स्पष्ट केले.
कलाकारांकडून काम काढून घेण्याची ताकद मांजरेकरांकडे आहे..

पहिल्या चित्रपटाच्या वेळी माझ्याकडे जेव्हा भूमिका आली तेव्हा शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणार याचाच मला आनंद होता. तेव्हा मकरंद अनासपुरे खूप लोकप्रिय होते, शिवाजी साटम यांचा तर मी ‘एक शून्य शून्य’ पाहत असल्यापासून चाहता होतो. सक्षमचाही ‘पक पक पकाक’ प्रदर्शित झाला होता. माझ्या वाटय़ाला अशी भूमिका होती की या कुटुंबातला काही महत्त्वाकांक्षा नसलेला, पण सगळंच हवंयचा अट्टहास असलेला तरुण.. अर्थात, त्या त्या कलाकाराची अभिनयाची ताकद काय आहे, तो कुठे कमी पडतो याचा विचार करून त्याच्याकडून भूमिका करून घेण्याची ताकद महेश मांजरेकर यांच्याकडे आहे, असं अभिनेता सिध्दार्थ जाधवने सांगितलं. तर त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत आपल्या वाटय़ाला आलेली दारुडय़ा बापाची भूमिका हेही मांजरेकर यांचा अभ्यास, त्यांनी त्या त्या भूमिकेसाठी दिलेली माहिती यामुळेच उत्तम जमून आल्याचे शिवाजी साटम यांनी सांगितले.