बॉलिवूडची खट्याळ अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असणारा ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातले ऐ जिंदगी गले लगा ले हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात शाहरुख आणि आलियाशिवाय कुणाल कपूर आणि अंगद बेदीही दिसत आहेत.

हे गाणे अमित त्रिवेदी याने संगीतबद्ध केले आहे तर अरिजीत सिंगने आपल्या सूमधूर स्वरात गायले आहे. १९८३ मध्ये आलेल्या ‘सदमा’ या सिनेमातले हे मूळ गाणे आहे. या गाण्याला या सिनेमात एका वेगळ्या अंदाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत ‘डिअर जिंदगी’ सिनेमाची ‘लव्ह यू जिंदगी’ आणि ‘जस्ट गो टू हेल’ ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.

गौरी शिंदे हिच्या दिग्दर्शनात बनलेला ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा आयुष्यातल्या उतार चढावावर भाष्य करतो. या सिनेमात शाहरुख आणि आलियासोबत अंगद बेदी आणि कुणाल कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

‘डिअर जिंदगी’मध्ये शाहरुख जहांगीर आणि आलिया कायरा या व्यक्तिरेखा साकारत आहेत. या सिनेमात शाहरुख आलियाचा गुरु दाखवण्यात आला आहे. या २५ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसोबतचा आलियाचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी ती फार उत्सुक आहे.