अनेक कलाकारांनी आतापर्यंत एकाच चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत एका चित्रपटात १६५ भूमिका साकारणारा अभिनेता हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. एका चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम अभिनेता दीप रॉय यांच्या नावावर आहे. हा आकडा ऐकल्यावर चित्रपटातील जवळपास सर्वच भूमिका त्यांनी साकारल्या असाव्यात, असं वाटणं साहजिक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं नव्हतं.
मग नेमकं असं काय घडलं होतं की दीप रॉय यांना एकाच चित्रपटात इतक्या भूमिका साकाराव्या लागल्या? या विक्रमी कामगिरीमागचं कारण काय होतं? आणि प्रत्येक व्यक्तिरेखा साकारताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? जाणून घेऊया या अनोख्या विक्रमामागची रंजक गोष्ट.
१६५ भूमिका का साकाराव्या लागल्या?
ही गोष्ट २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी’ या चित्रपटाची आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन टिम बर्टन यांनी केलं होतं. १९७१ मध्ये आलेल्या याच चित्रपटाच्या आधीच्या भागाच्या तुलनेत, दीप रॉय यांच्यासारखं दिसणारे अनेक कलाकार शोधण्यात निर्मात्यांना अडचणी येत होत्या. अखेर ही समस्या सोडवण्यासाठी दीप रॉय यांनीच पुढाकार घेतला. मात्र, यासाठी त्यांना मोठं आव्हान स्वीकारावं लागलं. कारण संपूर्ण चित्रपटात दिसणाऱ्या ‘ऊम्पा-लूम्पा’ (काल्पनिक व्यक्तिरेखा) या तब्बल १६५ भूमिका एकट्या दीप रॉय यांनीच साकारल्या. विविध हावभाव, नृत्य आणि वेगवेगळ्या दृश्यांसाठी त्यांना प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे साकारावी लागली, ज्यामुळे हे काम अत्यंत कठीण ठरलं.
१६५ भूमिका कशा शूट करण्यात आल्या?
दीप रॉय यांनी एकाच चित्रपटात १६५ भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारलं, पण त्या प्रत्यक्षात चित्रित कशा करण्यात आल्या, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी दिग्दर्शक टिम बर्टन यांनी विशेष व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि मोशन कंट्रोल कॅमेरा तंत्रज्ञान वापरलं. दीप रॉय यांना ‘ऊम्पा-लूम्पा’च्या प्रत्येक व्यक्तिरेखेत स्वतंत्रपणे अनेक वेळा शूट करावं लागलं. त्यानंतर या सर्व शॉट्स एकाच फ्रेममध्ये एकत्र (कॉम्पोझिट) करण्यात आले, ज्यामुळे पडद्यावर एकाच वेळी अनेक बुटकी पात्रं दिसत होती.
विशेष म्हणजे, सर्व व्यक्तिरेखा दिसायला सारख्याच असल्या तरी प्रत्येकाचा हावभाव, देहबोली, नृत्य आणि शैली वेगळी होती. त्यामुळे दीप रॉय यांना प्रत्येक भूमिकेसाठी स्वतंत्र अभिनय करावा लागला. डबल रोल करणारे अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील, पण एका चित्रपटात तब्बल १६५ भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून दीप रॉय यांनी वेगळाच विक्रम केला.
एका सीनसाठी वापरण्यात आलं १२.५ लाख लिटर चॉकलेट
‘चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी’मधील चॉकलेट नदीचं दृश्य आजही या चित्रपटातील सर्वात लोकप्रिय दृश्यांपैकी एक मानलं जातं. मात्र, यासाठी निर्मात्यांनी घेतलेली मेहनत फार कमी लोकांना माहीत आहे. या दृश्यासाठी तब्बल १२.५ लाख लिटर चॉकलेट वापरण्यात आलं होतं. जर तुम्ही हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल, तर तो जिओहॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
