जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘ट्रिपल एक्स…’ अग्रस्थानी

दीपिकाच्या या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाने ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे

अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि विन डिझेल
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या हॉलिवूड पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडण्यात यश मिळवले आहे. विन डिझेलसोबत xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटामध्ये काम करत दीपिकाने अनेकांनाच तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली होती. भारतात तिच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही जागतिक स्तरावर मात्र तिच्याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ३१ कोटी डॉलर्सची कमाई करत या चित्रपटाने वेगळ्याच विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत पाहिल्यास २०७५ कोटी इतकी आहे. हा गडगंज आकडा पाहून अनेकजण सध्या थक्क होत आहेत.

बॉक्स ऑफिस मोजोने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. चीनमध्ये दीपिकाच्या xXx… या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात या चित्रपटाने सुमारे १३.७ कोटी डॉलरची घसघशीत कमाई केली. उत्तर अमेरिकेमध्ये या चित्रपटाने ४.४ कोटी डॉलरर्सची कमाई केली खरी पण, चित्रपटाच्या जगभरातील कमाईचे आकडे पाहता उत्तर अमेरिकेत या चित्रपटाला संपूर्ण कमाईच्या फक्त १४ टक्के कमाईच करण्यात यश मिळाले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत भारतात या चित्रपटाने ५४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

दीपिका पदुकोण, विन डिझेल आणि सहकलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केलेल्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दीपिकाच्या या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाने ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ या चित्रपटाला मागे टाकत जॅकी चॅन यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटावरही मात केली आहे.

‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटवर्तुळात या चित्रपटाची चर्चा होती. २००२ मध्ये सुरु झालेल्या ‘ट्रिपल एक्स’ या चित्रपटाचा हा तिसरा भाग. २००५ मध्ये ‘xXx: स्टेट ऑफ दि युनियन’ हा सिनेमा आला होता. २००५ नंतर आलेला ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. त्यातही या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरली आकर्षण म्हणजे बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone and vin diesels xxx return of the xander cage become highest grossing film of

ताज्या बातम्या