बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या यशाच्या शिखरावर आहे. हॉलिवूड चित्रपटातून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या दीपिकाने दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००७ मध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. शाहरुखसोबत काम करण्यासाठी बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. त्यात जर पदार्पणातलाच चित्रपट शाहरुखसोबत करायला मिळाला तर मग काही विचारुच नका.. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणे दीपिकासाठी खासच होते. त्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबत अनेक चित्रपटही केले. मात्र, आता तिने बॉलिवूडच्या किंगसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजते.

दिग्दर्शक आनंद एल. राय शाहरुखला घेऊन एक चित्रपट करणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका आणि शाहरुख पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी मिळाले होते. मात्र, दीपिकाने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिलाय. त्याचे झाले असे की, दीपिकाचा संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट, ‘पद्मावती’चे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आनंद एल. राय यांना होकार देण्याअगोदरच दीपिकाच्या ‘पद्मावती’च्या तारखा पक्क्या झाल्या होत्या. या  चित्रपटावर येणाऱ्या सततच्या संकटांमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यत्यय येत राहिला आणि चित्रीकरण वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे सध्या इच्छा असूनही दीपिकाला शाहरुखसोबत काम करता येत नाहीये.

https://www.instagram.com/p/BStZSliBjY4/

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने आनंद यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर, चित्रपटाच्या टीमने नायिकेचा नव्याने शोध सुरु केला आहे. दीपिकानंतर दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटात कतरिनाला संधी देऊ शकतात, अशीही चर्चा सध्या चित्रपट वर्तुळात रंगताना दिसत आहे.  यापूर्वी ‘अनारकली ऑफ आरा’ या चित्रपटातील नायिका स्वरा भास्करनेही शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी आनंद एल. राय यांनी तिला शाहरुखच्या आईच्या भूमिकेची ऑफर दिली होती. पण स्वराने मात्र या भूमिकेला नकार दिला. या चित्रपटासंदर्भात अद्याप नायिकेची अधिकृत घोषणा झालेली नाही. कतरिनाशिवाय या चित्रपटाच्या स्पर्धेत सोनम कपूरचेही नाव आघाडीवर आहे असे समजते.