…म्हणून दीपिकाला पाहून सर्वांच्या भूवया उंचावल्या

ती आगामी चित्रपटासाठी फारच मेहनत घेत असल्याचे दिसते.

दीपिका पदुकोण,padmavati,
अभिनेत्री दीपिका पदुकोण

बॉलिवूडनंतर हॉलिवू़डमध्ये आपली ओळख निर्माण करणारी दीपिका पदुकोण नेहमीच अनेक कारणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. कधी फॅशनेबल लूकमुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी असते, तर कधी प्रेमप्रकरणामुळे ती चर्चेत राहिल्याचे दिसते. सध्या दीपिका तिच्या आगामी चित्रपटामुळे देखील प्रकाशझोतात आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर दीपिका आता एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. चित्रीकरणातून वेळ काढून नुकतीच दीपिका मुंबईनगरीत परतली आहे. विमानतळावर अवतरलेल्या दीपिकाकडे पाहून सर्वांच्याच भूवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

त्याचे कारण म्हणजे दीपिकाच्या हातातील पुस्तके पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या हातामध्ये मासिके किंवा कांदबरी नव्हे, तर राजस्थानच्या इतिहासाची मोठी मोठी पुस्तके दिसली. संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका राजस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करत असल्याचे तिच्या जवळील पुस्तके सांगत होती. ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये राजस्थानच्या राणीच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी तिने राजस्थानच्या इतिहासाचा अभ्यास सुरु केला आहे. दीपिका चित्रपटाची निवड करताना जशी सजगता बाळगते, अगदी त्याच प्रमाणे ती पात्रांचा अभ्यास देखील सुक्ष्मपणे करते. सध्या ती आगामी चित्रपटासाठी फारच मेहनत घेत असल्याचे दिसते.

बॉलिवूडमध्ये दीपिकाच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखविला जात असल्याचे सांगत जयपूर येथे चित्रपटाच्या सेटवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे दीपिका या भूमिकेसाठी अधिक मेहनत घेत असल्याचे नाकारता येत नाही. या वादामुळे दीपिकाचे चित्रपटातील भूमिका अधिक आव्हानात्मक बनली आहे. राजस्थानमध्ये झालेल्या घटनेनंतरही या चित्रपटाच्या अडचणी कमी झाल्याचे दिसले नाही. कोल्हापूर येथील मसाई पठारावर चित्रीकरण सुरू असताना मध्यरात्री सेट जाळण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. संजय लीला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपटात दीपिका पदुकोणशिवाय अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepika padukone takes padmavati way more seriously

ताज्या बातम्या