‘दिल्ली क्राईम’ या सिरीजला जगभरातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिझनच्या यशानंतर प्रेक्षक ‘दिल्ली क्राईम 2’ची आतुरतेने वाट बघत होते. अखेर दिल्ली क्राइमचा सिझन 2 नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच या सिझनने ओटीटी विश्वात धुमाकूळ घातलेला आहे. डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा शेफाली शाह, तर त्यांच्या टीममध्ये रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त हे कलाकार पुन्हा दिसत आहेत. या सीझनमध्ये काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये सक्रिय झालेल्या चड्डी बनियन गँगचा गुन्हा उलगडण्यात आलेला आहे.

हेही वाचा : ‘कुणास ठाऊक हल्ली कोणाच्या भावना केव्हा दुखावल्या जातील!’ अभिनेत्री गौहर खानचे ‘ते’ ट्विट चर्चेत

‘दिल्ली क्राईम सीझन 2’ चे कथानक दिल्लीतील वृद्धांना सतत टार्गेट करणाऱ्या ‘चड्डी बनियन’ टोळीबद्दल आहे. या टोळीला बाबरिया टोळी असेही संबोधले जाते. ही टोळी रात्रीच्या वेळी घरात घुसून धारदार शस्त्राने लोकांची निर्घृण हत्या करत असत. या वेब सिरीजनुसार, एक काळ असा होता जेव्हा या टोळीची खूप दहशत असायची. दिल्ली आणि इतर राज्यांच्या पोलिसांनी या टोळीतील अनेकांना अटक करून तुरुंगात पाठवले होते. या कुप्रसिद्ध गँगचा थरार दिल्ली क्राईम सीझन 2मध्ये पाहायला मिळणार आहे. पोलिसांनी कशाप्रकारे सापळा रचला, त्याआधी या गँगने कशाप्रकारे गुन्हे केले. वारंवार ही गँग का निसटायची, पोलीस-चड्डी बनियन गँगमधलं हे थरारनाट्य नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतंय. दिल्ली क्राईम सीझन 2 च्या ६ एपिसोड्समध्ये पाहायला मिळत आहेत.

‘दिल्ली क्राइम’च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. ‘दिल्ली क्राइम’चा पहिला सीझन दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित होता आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. त्यापाठोपाठ आता या सिरीजच्या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा सिझन २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता प्रदर्शित झाला. परंतु रात्री १२ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर प्रेक्षक या सिरीजची वाट पाहत असल्याची चर्चा करत होते.

आणखी वाचा : Delhi Crime 2 Trailer : ॲक्शन, ड्रामा अन् सस्पेन्स, बहुचर्चित दिल्ली क्राइम २ चा ट्रेलर प्रदर्शित

‘दिल्ली क्राइम 2’ बघून प्रेक्षक या सिझनचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक करताना दिसत आहेत. ‘दिल्ली क्राइम 2’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे. “पहिल्या सिझनसारखाच दुसरा सिझनही उत्कृष्ट बांधणी केलेला आहे,” असे एका नेटकऱ्याने लिहिले. तर “‘दिल्ली क्राइम 2’ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात उत्तमरित्या यशस्वी झाला आहे”, असे दुसऱ्याने लिहिले. अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्री शेफाली शाह यांच्या कामाचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. एकंदरीतच ‘दिल्ली क्राईम 2’ ओटीटीच्या जगात नवा विक्रम नोंदवणार असे दिसत आहे.