Netflix Desi Bling Satish Sanpal: नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ (Desi Bling) या लोकप्रिय रिॲलिटी शोमधून आपल्या आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन करणारे प्रसिद्ध उद्योगपती सतीश सनपाल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून युएईच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने सतीश सनपाल आणि त्यांच्या पत्नीची सर्व बँक खाती ३० दिवसांसाठी गोठवण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये किराणा दुकान चालवणाऱ्या सतीश सनपाल यांनी दुबईत जाऊन ३ अब्ज डॉलरची ‘अनाक्स होल्डिंग’ ही कंपनी उभारली होती. शोमध्ये ४० किलो सोन्याचे दागिने आणि रोल्स रॉयस गाड्यांचे प्रदर्शन करणाऱ्या सनपाल यांच्यामागे आता युएई एजन्सींचा ससेमिरा लागला आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरचा एक सामान्य माणूस दुबईत जाऊन मोठा उद्योगपती बनला, अशी ४१ वर्षांच्या सतीश सनपाल यांची ओळख आहे. सतीश हे ‘अनाक्स होल्डिंग’चे (Anax Holding) संस्थापक आहेत. त्यांच्या या बिझनेस ग्रुपचे मूल्य ३ अब्ज डॉलर (सुमारे २५ हजार कोटी रुपये) आहे, असं म्हटलं जातं. यात अनाक्स डेव्हलपमेंट्स, अनाक्स हॉस्पिटॅलिटी आणि अनाक्स कॅपिटल यांचा समावेश आहे.

तबिंदा सनपाल यांचं सोन्याबद्दल वक्तव्य

“माझ्याकडे ४० किलो सोन्याचे दागिने आहेत. सतीशला सोनं खरेदी करायला खूप आवडतं. प्रत्येक धनत्रयोदशीला तो मला ३ किलो सोनं भेट देतात,” असा दावा तबिंदाने या शोमध्ये केला होता. त्याचबरोबर आपल्या अफाट संपत्तीचं प्रदर्शनही त्यांनी या शोमध्ये केलं होतं.

सतीश सनपाल यांच्याविरोधात जबलपूरमध्ये ९ गुन्हे दाखल

मध्य प्रदेशात सतीश सनपाल यांच्याविरोधात ९ गुन्हे दाखल होते, तर २०२२ मध्ये सतीश यांच्याविरोधात ‘लुक आऊट सर्कुलर’ जारी करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२६ च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशात म्हटलंय की, ५ ऑगस्ट २०२२ रोजी जबलपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या विनंतीवरून सनपाल यांच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आले होते. त्यानंतर ९ पैकी ८ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सनपाल यांना जामीन मिळाला आहे. उर्वरित एका प्रकरणात जामीनपात्र गुन्हा असून त्यातही ते जामीन मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत, असं ६ मे रोजी त्यांच्या वकिलाने सांगितलं होतं.

सतीश सनपाल यांच्याकडे दुबईचा गोल्डन व्हिसा

२०१८ मध्ये दुबईतून जारी झालेल्या सनपाल यांच्या भारतीय पासपोर्टवर जबलपूर हे त्यांचे जन्मस्थान असल्याचं लिहिलंय. त्यात भारत, युएई, युके आणि सिंगापूर या देशांमधील प्रवासाची नोंद आहे. सनपाल शेवटचे २०२० मध्ये भारतात आले होते. त्यांच्याकडे २०२१ मध्ये मिळालेला १० वर्षांचा दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’ही आहे.

सतीश सनपाल यांची खाती ३० दिवसांसासाठी गोठवली

सध्या सतीश सनपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. युएईची मनी लाँडरिंगविरोधी एजन्सी-फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने देशातील बँका, वित्तीय संस्था आणि व्हर्च्युअल ॲसेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना सतीश सनपाल व त्यांच्या पत्नीची सर्व खाती तात्पुरती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. “सध्या ही कारवाई ३० दिवसांसाठी करण्यात आली आहे, त्याचा कालावधी एफआययू पुढे वाढवू शकते,” अशी माहिती सूत्रांच्या हावाल्याने एनडीटीव्हीने दिली आहे.

सतीश सनपाल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये त्यांचे नागरिकत्व ‘व्हानुआतू’ (Vanuatu) असल्याचं लिहिलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, सनपाल यांच्याकडे व्हानुआतूचे नागरिकत्व असण्यासोबतच सध्या भारतीय पासपोर्टही आहे. सनपाल दाम्पत्याबरोबरच अनाक्स कॅपिटल ॲसेट मॅनेजमेंट, अनाक्स कॅपिटल फायनान्शियल मार्केट्स, अनाक्स होल्डिंग आणि एसएसबी बाजार जनरल ट्रेडिंग या कंपन्यांवरही कारवाई झाली आहे.

कारवाई पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला त्याची माहिती देणे आणि व्यवहारांची वैधता आणि पैशांचा अधिकृत स्रोत काय, ते सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी युएईच्या एफआययूकडे सोपवली जातील.

या कारवाईबाबत सतीश सनपाल यांचे वकील कौशल जीत कैत यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, कोणत्याही तपास किंवा अंमलबजावणी यंत्रणेने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नसल्यामुळे या बातमीची पडताळणी करावी लागेल. तसेच सनपाल यांच्या व्हानुआतूच्या नागरिकत्वाबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.

सतीश सनपाल यांचा जबलपूर ते दुबई असा प्रवास

  • सतीश सनपाल नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ या रिॲलिटी शोमध्ये दिसल्यानंतर चर्चेत आले. किलोने सोनं खरेदी करण्यासह त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे त्यांनी आणि त्यांची पत्नी तबिंदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक वर्षांच्या कष्टांनंतर आणि मेहनतीनंतर हे यश मिळवलंय, असा दावा सतीश करतात.
  • ४१ वर्षांचे सतीश सनपाल हे मूळचे मध्य प्रदेशमधील जबलपूर इथले आहेत. आठवीनंतर त्यांनी शाळा सोडली आणि व्यवसाय क्षेत्रात आले. आईकडून ५०,००० रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी एक छोटं किराणा दुकान सुरू केलं. मात्र, हा व्यवसाय फार काळ चालला नाही आणि त्यांनी दुकान बंद केलं. जवळपास ११ वर्षांपूर्वी ते युएईला शिफ्ट झाले. तिथे सुरुवातीला त्यांनी ग्राहकांना शेअर बाजारातील ब्रोकर्सशी जोडण्याचं काम केले. त्यानंतर त्यांनी टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉटेल या क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.
  • २०१८ मध्ये सतीश यांनी ‘अनाक्स होल्डिंग्स’ची (Anax Holdings) सुरुवात केली. पुढे त्याअंतर्गत त्यांनी अनाक्स डेव्हलपमेंट्स, अनाक्स हॉस्पिटॅलिटी आणि अनाक्स कॅपिटल असे इतरही व्यवसाय सुरू केले. करोना काळात दुबईत त्यांनी स्वस्तात मालमत्ता घेतल्या आणि पुढे त्यातून मोठा नफा कमावला.
  • २०२२ मध्ये दुबईतील ‘एमिरेट्स बिझनेस कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘Entrepreneur of the Year (Nightlife)’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. युएईच्या बिझनेस जगतात सतीश सनपाल मोठं नाव आहे. पण नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ शोमध्ये झळकल्यानंतर ते आणि त्यांची पत्नी तबिंदा जगभरात ओळखले जाऊ लागले. या शोमध्ये बुर्ज खलिफामधील त्यांचे भव्य अपार्टमेंट आणि रोल्स रॉयससारख्या आलिशान गाड्यांचे कलेक्शन पाहायला मिळाले.
  • सतीश सनपाल व त्यांची पत्नी तबिंदा मोठमोठे कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांची मुलगी बेला हिच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीत आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान यांचे परफॉर्मन्स झाले होते, तसेच तमन्ना भाटिया आणि नोरा फतेही यांसारख्या बॉलीवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.