मराठीतील गुप्तहेर कथा म्हटलं की अनेकांच्या विशेषत: जुन्या-जाणत्यांच्या डोळ्यांसमोर बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथांचं विश्व उभं राहतं. त्या लोकप्रिय साहित्यविश्वाला आधुनिक वेबमाध्यमाची जोड देत आलेली डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यकथा ही वेबमालिका जुन्या आणि नव्या पिढीतील प्रेक्षकांना जोडण्याचा प्रयत्न करते.

चंद्रकांत चव्हाण या लेखकाने बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने १,०४२ रहस्यकथा लिहिल्या. लेखनाचा विक्रम केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांची नोंद आहे. त्यांनी लेखन केलं तो काळ होता १९३६ ते १९८४. तत्कालीन लोकप्रिय मराठी कादंबर्‍यांपेक्षा तरुण मुले अर्नाळकरांच्या रहस्यकथा चोरून वाचत. कारण खून, चोर्‍या अशा गुन्हेगारी विश्वातलं वाचन त्या काळी मुलांसाठी निषिद्ध होते. झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे अर्नाळकरांचे नायक मराठी घराघरांतून लोकप्रिय झाले. यातील धनंजय आणि छोटू ही पात्रे आपल्याला डिटेक्टिव्ह धनंजय- रहस्यकथा या वेबमालिकेत पाहायला मिळते.

या वेबमालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ४० ते ८० च्या दशकांमधील कथा जवळपास ४० वर्षांनंतरच्या आजच्या काळाशी सुसंगत कशा होतील, हे पाहिले गेले आहे. म्हणजे कथा जुनी आणि काळ मात्र आताचा. त्यामुळे काळाच्या पटलावर जुनाट झालेले गुन्ह्याच्या तपासाचे तांत्रिक अडसर मागे पडले. कथेचा गाभा कायम राहिला, पण काळानुरूप बदल केल्याने ही वेबमालिका आजच्या प्रेक्षकांनाही भावते.

वेबमालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची वातावरणनिर्मिती. प्रत्येक भागात सुरुवातीपासून शेवटपर्यंत रहस्याचा ताण कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसतो. अंधारे लोकेशन्स, पार्श्वसंगीत आणि कॅमेर्‍याच्या फ्रेम्समुळे मालिकेला एक वेगळा नॉयर टोन मिळतो. काही प्रसंगांमध्ये जुन्या मराठी रहस्यकथांची आठवण येते, तर काही ठिकाणी आधुनिक क्राइम थ्रिलरचा प्रभाव जाणवतो.

धनंजय हे पात्र शांत, संयमी, निरीक्षक वृत्तीचं आणि बुद्धिमान दाखवलं आहे. तो केवळ गुन्हेगार शोधत नाही, तर घटनांमागील मानसिकतेचाही मागोवा घेतो. त्यामुळे कथा फक्त ‘कोण गुन्हेगार?’ इथपर्यंत मर्यादित राहत नाही; तर समाजातील लोभ, सूड, भीती आणि सत्तेची लालसा यांचाही वेध घेते. कलाकारांनी भूमिकांमध्ये प्रामाणिकपणा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: तपासाशी संबंधित संवाद आणि प्रसंगांमध्ये वास्तवता जाणवते. एखादी गोष्ट आपल्याला खटकली की काही वेळातच त्याचं उत्तर मिळतं. उदाहरणार्थ, एका प्रसंगात धनंजयचा मोबाइल खराब होतो. पण मग त्याला दुसर्‍या मोबाइलवरून फोन करता आला नसता का, असा प्रश्न आपल्या डोक्यात येणार तोच त्याचं उत्तर पुढल्या एखाद्या प्रसंगात ओघवतं येतं. प्रमुख पात्र गुप्तहेर धनंजयचा संयत अभिनय आदिनाथ कोठारे याने समरसून केला आहे. त्याला छोटू – पुष्कराज चिरपुटकरने उत्तम साथ दिली आहे. अन्य कलाकारांच्या भूमिकाही उत्तम. पण लक्षात अर्थात ही दोनच पात्रे राहतात.

हा वेबमालिकेचा पहिला सीझन आहे. सात भागांची मालिका प्रत्येकी २० ते ३० मिनिटांच्या एपिसोडमध्ये संपते. पण तरीही काही ठिकाणी रेंगाळते. काही ट्विस्ट अंदाज येण्यासारखे वाटतात. पण या उणिवा सोडल्या तर मराठीत रहस्यप्रधान वेबकंटेंटची जी पोकळी जाणवत होती, ती या वेबमालिकेने भरून काढली आहे. श्रीरंग गोडबोले आणि आदिनाथ कोठारे या वेबमालिकेचे निर्माते आहेत. जुने रहस्यसाहित्य आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम अनुभवायचा असेल, तर ही वेबमालिका एकदा पाहण्यास हरकत नाही.

डिटेक्टिव्ह धनंजय -रहस्यजाल

ओटीटी प्लॅटफॉर्म – झी फाईव्ह

दिग्दर्शक – श्रीरंग गोडबोले

कलाकार – आदिनाथ कोठारे, पुष्कराज चिरपुटकर व अन्य